शिवसेना
शिवसेना (Shiv Sena) हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 19 जून 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली गेली. शिवसेनेने मराठी आणि मराठी माणूस हा मुद्दा हाती घेतल्याने शिवसेनेवर प्रांतवादाचा शिक्काही बसला. पण या सर्वांकडे दुर्लक्ष करत बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची वाटचाल सुरू ठेवली. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे शिवसेनेचं सुरुवातीचं ब्रिद होतं. त्यानंतर शिवसेना हळूहळू निवडणुकीच्या राजकारणात उतरली. 1989 साली शिवसेनेने भाजपसोबत युती करून निवडणुका लढवल्या. 1995मध्ये शिवसेनेला राज्यात सत्ता आली. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1999मध्ये केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्येही शिवसेना सहभागी झाली होती. शिवसेनेला लोकसभेचं अध्यक्षपदही देण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले. 2019च्या निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण अडीच वर्षानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केलं. 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांना घेऊन शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेना कुणाची हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेले असता आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं. आता हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.