मुंबई : आपल्या सर्वांनाच थोडे जरी लागले की, लगेचच त्रास (Trouble) होतो. कधी जखम मोठी असली की, आपण रडतो देखील. त्याचे कारण म्हणजे आपल्याला लागलेल्या जखमेमुळे प्रचंड त्रास होतो. साधी सुई जरी टोचली तरीही आपल्याला वेदना होतात. मात्र, इंग्लंडमध्ये (England) एक मुलगा असा आहे की, त्याला काहीही लागले किंवा रक्त जरी निघाले तरीही त्याला अजिबात त्रास होत नाही. होय हे खरेच आहे, तुम्ही जे वाचत आहात ते अगदी खरे आहे. या मुलाला पायाला किंवा हाताला शरीराच्या (Body) कोणत्याही भागामध्ये लागले तरीही त्याला अजिबात त्रास होत नाही.
हा मुलगा इंग्लंडमधील नॉर्विचमध्ये राहतो. तुम्हाला वाटेल की, या मुलांकडे एखादी शक्ती वगैरे आहे. ज्यामुळे याला दुखापत झाल्यावर त्रास होत नाही. मात्र, असे काहीही नसून या मुलाला एक दुर्मिळ आणि विचित्र आजार आहे, ज्यामुळे त्याला दुखापत झाल्यावर त्रास होत नाही. जॅक स्किटमोर असे या दुर्मिळ आजाराने ग्रस्त मुलाचे नाव आहे. मिररच्या वृत्तानुसार, जॅकच्या पालकांनी सांगितले की, जॅक 6 वर्षांचा असताना त्यांना या आजाराची माहिती मिळाली. पहिल्यांदा जेंव्हा लस घेण्यासाठी जॅकला त्याचे पालक घेऊन गेले होते त्यावेळी लस दिल्यानंतर तो रडला नव्हता.
जॅक चार वर्षांचा झाल्यावर एकदा जेवण करताना त्याची जिभ चावली गेली तर त्यावेळी तो अजिबात रडला नाही आणि त्यावेळी जॅकच्या आई-वडिलांनी त्याला डॉक्टरांना दाखवले, तेव्हा त्यांना कळले की, जॅकला असा दुर्मिळ आजार आहे, जो लाखोंपैकी एका व्यक्तीला होतो आणि त्या आजाराच्या रुग्णाला त्याची जाणीवही होत नाही. रिपोर्ट्सनुसार, जॅकला जो दुर्मिळ आजार आहे, त्याच्यावर ब्रिटनमध्ये कोणताही उपचार नाही, त्यामुळे त्याचे पालक त्याला अमेरिकेत नेऊन उपचार करण्याचा विचार करत आहेत.