मेरी उमर के बेरोजगारों… लुंगी नेसून तरुणांचं धमाकेदार गाणं; हे गाणं तुम्ही ऐकलंय का?
सोशल मीडियावर रोज कोणी ना कोणी काही तरी व्हायरल करत असतं. प्रत्येकजण रिल बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे लक्ष आकर्षित करत असतो. पाच तरुणांनीही एक व्हिडीओ शेअरकडून त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष आकर्षित केलं आहे. पण...
नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : देशात महागाई प्रचंड वाढली आहे. नोकऱ्यांचा तुटवडा आहे. लाखो तरुणांच्या हाताला काम नाही. फक्त लाखो नोकऱ्यांची निर्मिती केली जात असल्याचं सांगितलं जातं. हे सर्व आकडे कागदावरच असतात. प्रत्यक्षात मात्र नोकरीच्या नावाने बोंबाबोंब आहे. त्यामुळे देशभरातील तरुण चिंतेत आहे. काही तरुणांनी तर नोकरीवरून चक्क गाणच तयार केलं आहे. पाच तरुण एकत्र आले. त्यांनी स्वत:चाच टाइपास बँड तयार केला आणि हे गाणं मजेदार अंदाजात सादर केलंय. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्हीही हे गाणं पाहाल तर तुम्हालाही हसू फुटल्याशिवाय आणि नोकरीची तीव्रता जाणवल्याशिवाय राहणार नाही.
बिहारच्या भागलपूरमध्ये राहणारा यूट्यूबर आदर्श आनंदने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ तयार केला होता. त्यात त्याने अभिनेता ऋषी कपूर यांचं प्रसिद्ध गाणं मेरी उमर के नौजवानो या गाण्याचं रिमिक्स केलं आहे. या गाण्याच्या चालीवर स्वतंत्र गाणं तयार केलं आहे. आणि हे गाणं बेरोजगारीवर आहे. कर्ज सिनेमातील गाण्याच्या चालीवरील हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्याला तरुणांनी प्रचंड पसंती दिली असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल केलं जात आहे.
हाफ चड्डी, लुंगी अन् गॉगल
एका मोकळ्या मैदानात पाच तरुण म्यूझिक बँडसारखे उभे आहेत. एकाच्या हातात गिटार आहे. तर दुसऱ्याने ड्रम म्हणून स्टिलच्या बादल्या लावल्या आहेत. कुणी कंगव्याचा माईक बनवला आहे. तर कुणी पाण्याची बॉटल माईक म्हणून वापरली आहे. काही जण हाफ चड्डीत आहेत. काही लुंगीवर आहेत. मुख्य गाणं गाणाऱ्याने जीन्सवर लुंगी गुंडाळली आहे. सर्वांच्या डोळ्यावर जत्रेत मिळतात तसे रंगीबिरंगी चष्मे आहेत. सर्वजण रॉकस्टार सारखं परफॉर्म करत आहेत. त्यानंतर हे गाणं सुरू होतं.
काय आहेत गाण्याचे बोल?
हे क्या तुमने कभी कोई फॉर्म फिल किया?
रेलवे को चार सौ एक्स्ट्रा दिया,
मैंने भी दिया.
ला… ला… ला…
मेरी उमर के बेरोजगारों जाति धर्म के चश्मे उतारो.
देखो ये कमिशन, दे रहे हैं हमको टेंशन.
यूपीएसएससी, एसएससी, रेलवे हर कोई खेलता है छात्रों से खेल वे,
लेते नहीं हैं एग्जाम यूंहीं साल हमारे बर्बाद करते….
व्यंगातून व्यथा
या व्हिडीओतून आदर्श आनंदने व्यंगातून तरुणांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना नोकऱ्या द्या, असं या गाण्यातून या तरुणांचं म्हणणं आहे. तसेच जाती धर्माच्या भानगडीत पडू नका, असं आवाहनही या गाण्यातून करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रचंड कमेंट्स येत आहेत. तर दुसरीकडे यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. आम्हीही बेरोजगार आहोत. या मुलांच्या व्यथा, वेदना समजू शकतो, असं एकाने म्हटलंय. तर वाह, कमालच झाली. छा गए भाई लोग, अशी प्रतिक्रिया दुसऱ्याने व्यक्त केली आहे.
मेरी उमर के बेरोजगारों.. जाति धर्म के चश्मे उतारो..!! #बेरोजगारी_के_खिलाफ_भारत pic.twitter.com/ltYbfXUigJ
— #Andolanjeevi Vandana Gupta (@vandana_21gupta) September 21, 2023