जावयाच्या स्वागतासाठी 173 पक्वान, तयारीसाठी सासूला लागले 4 दिवस; सगळे पदार्थ बनवले घरी
आईच्या घरी असे खास स्वागत पाहून मुलीलाही प्रचंड आनंद झाला. सर्वांनी घरातील डायनिंग टेबलवर 173 पदार्थांचा आस्वाद घेतला.
भारतीय कुटुंबांमध्ये मुलीच्या पतीच्या म्हणजेच जावयाच्या आदरातिथ्याला आणि आदराला विशेष स्थान आहे. उत्तर असो वा दक्षिण आणि पूर्व असो वा पश्चिम, देशाच्या कानाकोपऱ्यात सासू-सासरे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जावयाची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. बायकोच्या माहेरी इतर नातेवाईकांपेक्षा जावयाला विशेष स्थान असतं असं म्हणायला हरकत नाही. नुकतंच आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका जावयाच्या स्वागतासाठी 173 पदार्थ बनविण्यात आले.
जिल्ह्यातील भीमावरमचे हे प्रकरण आहे. शहरातील व्यापारी टाटावर्ती बद्री यांनी आपला हैदराबाद येथील जावई पृथ्वीगुप्त चावला आणि मुलगी श्री हरिका यांना संक्रांत सणाच्या निमित्ताने आमंत्रित केले आणि त्यांच्यासाठी घरी 173 प्रकारच्या पदार्थांची व्यवस्था केली.
“माझी मुलगी हरिका आणि जावई पृथ्वीगुप्त चावला गेल्या दोन वर्षांपासून कोविड निर्बंधांमुळे आमच्या घरी येऊ शकले नव्हते. या दोन वर्षांत आम्ही मुलगी आणि जावयासोबत संक्रांतीचा सणही साजरा करू शकलो नाही. पण यंदा आम्ही हा सण एकत्र साजरा केला आहे.” असं टाटावर्ती बद्री म्हणाले.
टाटावर्ती बद्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी गेल्या चार दिवसांपासून हे सर्व 173 प्रकारचे पदार्थ तयार करण्याचे काम करत होती. संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर आम्ही आमच्या जावयाला आणि मुलीला बोलावून त्यांना सर्व पदार्थ दिले.
बद्री यांच्या पत्नी संध्या म्हणाल्या, ‘जावईसाठी तयार करण्यात आलेल्या खास वस्तूंमध्ये बाजरी, पुरी, कारलं, हलवा, पापड, लोणचे, मिष्ठान्न, सॉफ्ट ड्रिंक्स आणि गोळी सोडा यांचा समावेश आहे. आईच्या घरी असे खास स्वागत पाहून मुलीलाही प्रचंड आनंद झाला. सर्वांनी घरातील डायनिंग टेबलवर 173 पदार्थांचा आस्वाद घेतला.