टकल्यावर एक केस सोडा, इथं डोळ्यांनाच झाली गंभीर इजा; रामबाण औषधाच्या नादात 65 ‘बाला’ रुग्णालयात
Hair Growth Medicine Side Effect : सोशल मीडियावर डोक्यावर केस उगवण्याचा दावा करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यातच एक चमत्कारीक लेप लावून केस उगवण्याचा प्रयोग सपशेल फेल झाल्याचे समोर आले आहे. अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याचे समोर येत आहे.

घनदाट, काळेभोर, लांबसडक केस असावे अशी स्त्रीचीच नाही तर पुरुषांची पण अपेक्षा असते. पुरूषांना अकाली टक्कल पडत असल्याने अगदी तारुण्यातच अनेक जण ‘बाला’ होतात. आयुष्यमान खुराणा या अभिनेत्याने बाला या चित्रपटातून अशा तरुणांच्या व्यथा मांडल्या आहेत. मग केसांचे भरघोस पिक घेण्यासाठी अनेक जण वैद्य, हकिमाकडे धाव घेतात. आता सोशल मीडिया सक्रिय झाल्यापासून तर त्यावर एक, दोन महिन्यात डोक्यावर केसांची शेती पिकण्याचा कोण दावा करण्यात येतो की तिथं टकल्यांचा कुंभमेळा भरतो. अगदी जुजबी शुल्क, एक कुठल्यातरी गुढ औषधांचा लेप लावला की केसच केस येतात असा दावा करणारे अनेक तरूण समोर येतात. मग प्रचंड गर्दी जमा होते. असाच काहीसा प्रकार पंजाबमध्ये सुरू होता. पण या औषधांना टकल्यावर एक केस सोडा. डोळेच्या दृष्टीच जाण्याची वेळ आली आहे.
अनेक जण रुग्णालयात दाखल
आमच्या लेपाने केस उगवतात असा दावा करणाऱ्या या केसबाबाकडे अनेकजण खेपा टाकत होते. त्यातील काहींची पहिली तर काहींची दुसरी, तिसरी वेळ होती. पंजाबमधील संगरूर येथे हा केस उगवण्याचा जाहीर कार्यक्रम सुरू होता. कुठल्या तरी जडीबुटीचा लेपा डोक्यावर लावायचा. लेप लावेपर्यंत डोळे बंद ठेवायचे. डोक्याला हात लावायचा नाही. अशा गैरवाजवी सूचना देण्यात येत होत्या. ज्यांच्या डोक्यावर हा लेप लावण्यात आला. अचानक त्यांच्या डोळ्यात जळजळ सुरू झाली. जळजळ कसली नुसती आग सुरू झाली. काहींना तर डोळे उघडले तरी अस्पष्ट दिसायला लागले. एका मागून एक सर्वच जण तक्रार करायला लागल्याने मग सर्वांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले.




काय आहे हे प्रकरण?
एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, पंजाबमधील संगरूर येथील काली मंदिराजवळ केस उगवण्यासंबंधीचा हा कार्यक्रम सुरू होता. त्याचा समाज माध्यमावर जोरदार प्रचार, प्रसार करण्यात आला. त्यात चमत्कारिक औषधाने टकल्यावर केस उगवतील असा दावा करण्यात आला. त्यामुळे अकाली ज्यांची केस गळती झाली अशा सर्वांनी तिथे जमके गर्दी केली. तिथल्या स्वयंसेवकांनी अनेक टकल्यांच्या डोक्यावर लेप फिरवला. त्यांना सूचना दिल्या. पण हे औषध टकल्यावर लावताच त्यांच्या डोळ्यांना जबरदस्त इजा झाली. यामध्ये 65 अधिक जणांना रुग्णालयात ताबडतोब भरती करण्यात आले.
तथाकथित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी संगरूर पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर अमनदीप सिंह आणि तजिंदर पाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, या सर्व रुग्णांचे डोळे जळजळ करत आहेत. तर काहींचे डोळे सुजले आहेत. त्यांच्यावर इलाज, उपचार सुरू आहेत.
यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात असेच प्रकरण मेरठमध्ये समोर आले होते. यामध्ये सलमान आणि अनीस हे दोन भाऊ 20 रुपयांत घनदाट केस उगवण्याचा दावा करत होते. त्यासाठी देशभरातून टक्कल पडलेल्या लोकांची लाटच तिथे आली होती. शेवटी आशेवर जग टिकून आहे असे म्हणतात. पण काही जणांना गुण आल्यानंतर इतरांना कोणालाच काही फायदा झाला नाही. तक्रारीनंतर दोघांना पोलिसांनी अटक केली होती.