Video: रोलरकोस्टरचा थरार पडला महागात! ‘एरो 360’ राइडमध्ये उलटे लटकले लोक
या अम्युझमेंट पार्कमध्ये मजामस्ती करण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांना अत्यंत भयानक अनुभवाला सामोरं जावं लागलं. सोमवारी ही घटना घडली. 'एरो 360' (Aero 360) या राइडमध्ये काहीजण बसले होते.
अम्युझमेंट पार्क्समधील (amusement park) रोलरकोस्टर राइड्समध्ये बसण्याची अनेकांची इच्छा असते. आयुष्यात एकदा तरी अशा राइडमध्ये बसावं, असं अनेकांना वाटतं. मात्र अशा राइड्समध्ये (roller coaster ride) बसल्यावर ती मधेच अडकली तर काय कराव, आपण त्यात उलटे लटकलो तर काय, अशीही भीती अनेकांना असते. मात्र हीच भीती वेस्टर्न पेनसिल्व्हेनियामधील केनीवुड पार्कमधल्या काही लोकांबद्दल खरी ठरली. या अम्युझमेंट पार्कमध्ये मजामस्ती करण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांना अत्यंत भयानक अनुभवाला सामोरं जावं लागलं. सोमवारी ही घटना घडली. ‘एरो 360’ (Aero 360) या राइडमध्ये काहीजण बसले होते. ही राईट जेव्हा वर पोहोचली तेव्हा ती तिथेच अडकली आणि त्यात बसलेले पर्यटक हे उलटे लटकले. असोसिएटेड प्रेसच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
‘एरो 360’ राइडमध्ये अडकलेल्यांची काही वेळाने सुखरुप सुटका करण्यात आली. त्यानंतर ही राइड इतरांसाठी बंद करण्यात आली. याप्रकरणी सध्या तपास सुरू आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत ती राइड बंदच ठेवण्यात येणार असल्याचं वृत्त ‘एबीसी’ने दिलं.
पहा व्हिडीओ-
“राइड्सची देखभाल करणाऱ्या स्टाफने लगेचच ती राइड सुरू केली आणि खाली आल्यावर अडकलेल्या लोकांची सुटका केली. राइडर्सची सुरक्षा हे आमचं प्राधान्य आहे. जोपर्यंत या घटनेचा आढावा घेतला जात नाही, तोपर्यंत ती राइड बंद राहील”, असं पार्कच्या प्रवक्त्याने सीबीएस पिट्सबर्गना सांगितलं. त्या पार्कला भेट देण्यासाठी आलेल्या लायला ब्रुनर हिने सीबीएस पिट्सबर्गशी बोलताना सांगितलं, “मी कदाचित कधीच त्या राइडवर बसणार नाही. असं पुन्हा कधी होऊ नये अशी मी आशा करते. इतर काही राइड्समध्ये जरी अडकलो तरी त्यात भीती वाटणार नाही, कारण ते तितके धोकादायक नाहीत. पण एरो 360 मध्ये कधीच कोणी अडकू नये.”
युनायटेड किंग्डममधील एका पार्कमध्ये अशीच एक घटना घडली. ब्लॅकपूल प्लेजर बीचवर एक रोलरकोस्टर राईड मध्यभागीच अडकली आणि रायडर्स जमिनीपासून 200 फुटांपेक्षा जास्त उंचीवर अडकले होते.