Desi Khat : या देशी बाजेचा थाट लय भारी, ऑनलाईन किंमत वाचून आठवेल दुनियादारी!
Desi Khat : गावाकडील बाज, खाटेची अवस्था असून अडचण, नसून खोळंबा अशी आहे. पण परदेशात या खाटेला जोरदार मागणी आहे, पण त्याची किंमत ऐकून अनेकांची खटिया खडी होईल.
नवी दिल्ली : गावाकडील बाज, खाटेची (Desi Khat) अवस्था असून अडचण, नसून खोळंबा अशी आहे. गावात ही आता पलंग, कॉट आणि अजून काय काय आलं आहे. त्यामुळे आरोग्यासाठी, विशेषता पाठीच्या दुखण्यावर रामबाण उपाय मानण्यात येणाऱ्या बाजेची अवस्था तशी वाईटच आहे. अनेक ठिकाणी ती गोठ्यात, शेतात अंब्याखाली अथवा खोपडीत दिसते. पण मोठमोठ्या वाड्यातून, बंगल्यातून तिचं अस्तित्व कधीचंच संपले आहे. पण परदेशात या खाटेला जोरदार मागणी आहे, पण त्याची किंमत (Khat Price) ऐकून अनेकांची खटिया खडी होईल.
किती आहे किंमत ज्या बाजेवर बसून तुम्ही आजी-आजोबांकडून गावकुसाकडील गप्पा, गोष्टी ऐकल्या आहे. तिची किंमत तुम्हाला हैराण केल्याशिवाय राहणार नाही. गावाकडे फारतर दोन ते चार हजारात विक्री होणारी खाट परदेशात मात्र खूप मोठ्या किंमतीला विक्री होते. विणणारा जर घराचा असेल तर अवघ्या 1500 रुपयांपर्यंत बाज विणल्या जाते.
हे तर एक कसब बाज विणणे हे पण एक कसब आहे. गावातील काही थोड्याच लोकांना त्याचे ज्ञान आहे. वीण घट्ट आणि डिझाईन करता येणे ही एक कला आहे. ती सर्वांनाच जमत नाही. त्यात पीळ ही योग्य असणे गरजेचा आणि खाट विणताना कोणतीही गाठ तयार होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
ऑनलाईन किती किंमत दोरीच्या सहायाने विणलेली खाट परदेशात ऑनलाईन विक्री होते. ही खाट 1 लाख रुपयाला विक्री झाली. तुम्हाला वाटलं असेल की लाकडी, दोरी पासून तयार होणाऱ्या बाजेला बाजारात कोणी विचारत नाही. मग परदेशात या बाजेला इतकी किंमत कशामुळे देण्यात येत आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
हाताने तयार केली म्हणून महाग एका अमेरिकन ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट, Etsy ने अनेक प्रकारच्या खाट विक्री केली आहे. या खाटेला या वेबसाईटने मस्त नाव दिले आहे. ‘इंडियन ट्रॅडिशनल बेड व्हेरी ब्युटिफुल डेकोर’ असे नाव दिले आहे. या खाटेच्या खाली तिची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ही बाज भारतीय कारागिरांनी हातींनी तयार केल्याचे वर्णन करण्यात आले आहे. ही बाज तयार करण्यासाठी जुटची दोरी आणि टिकाऊ लाकडाचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या खाटेची ऑनलाईन किंमत 1,12,213 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
किंमत जोरदार या वेबसाईटवर एकच नाही तर अनेक बाज विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या खाटेच्या किंमतीत तफावत आहे. या खाटेची किंमत 90 हजार, 70 हजारापासून ते एक लाख आणि त्यापुढे पण आहे. या बाजेत काहीच विशेष नाही. गावाकडे तयार होणाऱ्या खाटेसारखीच ही खाट आहे. पण जिथे पिकते, तिथे ते विकत नाही, ही म्हण आपल्याकडे उगीच आली नाही. आपल्या देशात बाज अडगळीला गेली असली तरी परदेशात मात्र या देशी बाजेची क्रेझ आहे.