विमानाला हॉर्न असतात! का कशासाठी? नेमका त्याचा वापर कशासाठी?
विमानातही हॉर्न असतात, पण आता आकाशात हॉर्नचं काय काम, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

तुम्ही ट्रेनमध्ये हॉर्नचा आवाजही ऐकला असेल. कोणतीही ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच हॉर्न वाजवते, जेणेकरून एखादा प्रवासी प्लॅटफॉर्मच्या जवळ असेल तर त्याला त्यापासून योग्य अंतर करता येईल. मात्र, तुम्ही कधी विमानातील हॉर्नबद्दल ऐकले आहे का किंवा त्याचा आवाज कधी ऐकला आहे का? होय, विमानातही हॉर्न असतात, पण आता आकाशात हॉर्नचं काय काम, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. विमानात हॉर्न का आणि कोणत्या अटींसाठी बसवले जातात हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देऊ.
विमानातील हॉर्नचा उपयोग आकाशात समोरून आलेले विमान बाजूला काढण्यासाठी केला जात नाही. कारण एकाच मार्गावर दोन विमानं समोरासमोर येण्याची शक्यता कमी आहे. या हॉर्नचा पक्षी बाजूला करण्यासाठी सुद्धा उपयोग होत नाही. या हॉर्नचा वापर ग्राउंड इंजिनीअर आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी केला जातो. विमान उड्डाणापूर्वी बिघाड किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असेल तर त्यावेळी विमानाच्या आत बसलेला पायलट किंवा इंजिनीअर हा हॉर्न वाजवून ग्राउंड इंजिनीअरला अलर्ट मेसेज पाठवतो.
विमानाचा हॉर्न त्याच्या लँडिंग गिअरच्या कंपार्टमेंटमध्ये बसवण्यात आलाय. त्याचे बटन विमानाच्या कॉकपिटवर आहे. या बटणाच्या वरच्या बाजूला जीएनडी लिहिलेलं आहे. हे बटन दाबल्याने फ्लाइटची अलर्ट सिस्टिम चालू होते आणि त्यामुळे सायरनसारखा आवाज येतो.
विमानात स्वयंचलित हॉर्नही असतात, जे सिस्टीममध्ये बिघाड झाल्यावर किंवा आग लागल्यावर आपोआप वाजू लागतात. खास गोष्ट म्हणजे या हॉर्नचा आवाजही वेगळा असतो, जो वेगवेगळ्या यंत्रणांमधील बिघाडानुसार वेगवेगळ्या आवाजात वाजतो. त्यांच्या वेगवेगळ्या आवाजांवरूनच विमान अभियंत्यांना उड्डाणाच्या कोणत्या भागात बिघाड झाला आहे, हे कळू शकतं!