आयुष्यात कितीही यश, नाव आणि पैसा कमावलं तरी अत्यंत महत्त्वाच्या क्षणी एखादा व्यक्ती किती नम्रपणे वागू शकतो, यावरून त्या व्यक्तीच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. याचीच प्रचिती देणारे दोन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो आहेत प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांच्या अंत्यविधीतील. संतूरवाद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणारे पंडित शिवकुमार शर्मा यांचं 10 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीतील या दोन फोटोंची सोशल मीडियावर विशेष चर्चा होत आहे. प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन (Zakir Hussain) यांचे हे फोटो आहेत.
शिवकुमार शर्मा यांना गमावल्याचं दु:ख झाकीर हुसैन यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतंय. एका फोटोत ते शिवकुमार यांच्या पार्थिवाला खांदा देत आहेत, तर दुसऱ्या फोटोत ते त्यांच्या चितेसमोर उभे आहेत. ‘पंडित शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवाला खांदा देणारे आणि त्यांच्या चितेजवळ एकटेच उभे असणारे उस्ताद झाकीर हुसैन. उन्माद सोडा…हा देश असाच असावा,’ अशी कमेंट लिहित एका नेटकऱ्याने हा फोटो पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘एक फोटो संपूर्ण आयुष्याचं वर्णन करू शकतो. अगदी तसाच हा फोटो आहे. मैत्रीची व्याप्ती, एकता आणि मित्राला गमावल्याचं दु:ख. हा फोटो पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं’, असं एकाने लिहिलं. तर ‘हेच भारताचं सौंदर्य आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
गेले काही महिने पंडित शिवकुमार शर्मा हे मूत्रपिंडाशी संबंधित आजाराशी झुंज देत होते. मंगळवारी 10 मे रोजी ही झुंज संपली. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा राहुल शर्मा असा परिवार आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाचं वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, संगीत श्रेत्रातील नामवंतांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.