‘ड्रीम होम’ स्वप्नचं ठरणार? परवडणाऱ्या घराच्या किंमती गगनाला, कर्ज महागलं
बांधकाम खर्चात वाढ झाली आहे. सिमेंट, वाळू, लोखंड, स्टील सर्वप्रकारे महाग झाले आहेत. वाढत्या निर्मिती खर्चामुळे (CONSTRUCTION COST) बिल्डरांचं उत्पन्न कोलमडलं आहे.
नवी दिल्ली : महागाईच्या आगीत सर्वसामान्य होरपळून निघाले आहे. जीवनावश्यक वस्तूंसोबतच इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईची झळ रिअल इस्टेट (REAL ESTATE) क्षेत्राला बसली आहे. कोविड प्रकोपाच्या काळात गती मंदावलेल्या क्षेत्राला पुन्हा एकदा महागाईचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पायाभूत साहित्यांच्या वाढत्या किंमतीमुळे परवडणाऱ्या किंमतीतील (AFFORDABLE HOUSING) घराचं स्वप्न साकार होण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, बांधकाम खर्चात वाढ झाली आहे. सिमेंट, वाळू, लोखंड, स्टील सर्वप्रकारे महाग झाले आहेत. वाढत्या निर्मिती खर्चामुळे (CONSTRUCTION COST) बिल्डरांचं उत्पन्न कोलमडलं आहे. वाढत्या महागाईमुळे प्रति स्क्वेअर फूटचे दर 500-800 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
निर्मिती खर्च दुप्पट:
बिझनेस लाईनच्या वृत्तानुसार, स्टील, सिमेट, मजूर खर्च, रंगकाम आदी खर्चात 5-10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्रेडाई संघटनेच्या प्रतिनिधींनी निर्मिती खर्च पाच ते दहा टक्क्यांनी वाढल्याचं म्हटलं आहे. महागाईचा स्तर कायम राहिल्यास चालू वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत किंमत 8-10 टक्क्यांपर्यंत वाढीचा अंदाज आहे.
व्याजदरात वाढीचा दबाव
महागाईच्या झळांसोबत वाढत्या व्याजदराचा फटका बसण्याची चिन्ह आहेत. रिझर्व्ह बँक व्याज दरात वाढ करण्याच्या मानसिकतेत आहे. व्याजदरात वाढ झाल्यास गृहकर्जात अधिक वाढ नोंदविली जाईल. त्यामुळे निश्चितपणे खरेदी करणाऱ्यांवर मोठा परिणाम होईल. वाढत्या निर्मिती खर्चामुळे बिल्डर्स किंमत वाढीच्या मानसिकतेत आहे. व्याजदरवाढीमुळे ईएमआयमध्ये वाढ अपेक्षित आहे.
स्वप्नातील घराचे ‘हे’ अडथळे-
· निर्मिती खर्चात दुप्पटीने वाढ
· सिमेंट ते रंगकाम सर्वांच्या किंमती गगनाला
· प्रति स्क्वेअर फूट बांधकामाचा दर सर्वोच्च स्थानावर
· बँकांचे कर्जाचे हफ्ते वाढणार
· बिल्डरांचा नव्या गृहप्रकल्पाला ब्रेक
परवडणाऱ्या घराचं स्वप्नचं:
परवडणाऱ्या किंमतीत घरांची उपलब्धता करण्याचे मोठे आव्हान गृहनिर्मात्यांसमोर असणार आहे. एनारॉक संस्थेचे चेअरमन अनुज पुरी यांनी कोरोना प्रकोपामुळे सर्वाधिक फटका परवडणाऱ्या किंमतीतील घरांवर झाला असल्याचं निरीक्षण नोंदविलं आहे. महाराष्ट्रातील मुंबई-पुण्यासहित देशांतील सात महानगरातील किंमतीत कोविड पूर्व आणि नंतर असा मोठा फरक जाणवत आहे.