Festive Car Loan | सणामध्ये घरी आणा नवी कोरी कार, सुलभ कर्जासाठी या टिप्स फॉलो करा..
Festive Car Loan | आजच्या गणेश चतुर्थीने उत्सवाचा मुहूर्त साधला गेला आहे. आता विविध सणांचा रेलचेल राहील. या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर पगारदार वर्गासाठी स्वस्तात कर्ज घेण्याची सुविधा मिळू शकते.
Festive Car Loan | आजच्या गणेश चतुर्थीने उत्सवाचा मुहूर्त साधला गेला आहे. आता विविध सणांचा रेलचेल राहील. पुढील महिन्यापासून सणांचा हंगाम (Festive Season) सुरू होत आहे. या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर पगारदार वर्गासाठी (Salaried) स्वस्तात कर्ज घेण्याची सुविधा मिळू शकते. आवश्यक सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर नवी कोरी कार (Car) तुम्ही घरासमोर उभी करु शकता. सरकारी आणि खासगी दोन्ही बँका (Bank) ग्राहकाची पत, कागदपत्रे, क्रेडिट स्कोअर याआधारे कर्ज मंजूर करतात. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर सहज कर्ज मिळते. तरीही कार लोन (Car Loan) घेण्यापूर्वी तुम्ही थोडा अभ्यास केला तर कमी व्याजदर, मोफत प्रक्रिया शुल्क, सुलभ प्रीपेमेंटची सुविधा यासह इतर सुविधा मिळू शकतात. जर वाहन कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर या टिप्स आवर्जून वाचा.
हिशेबाचा ताळमेळ बघा
वाहन कर्ज आता सहज मिळते. त्यासाठी पूर्वीसारख्या फार किचकट प्रक्रिया करण्याची गरज नाही. काही कागदपत्रे आणि क्रेडिट स्कोअर आधारे कर्ज सहज मिळते. पण काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या वाहनाची किंमत. ती एकदा लक्षात आली की, अॅडव्हान्स पेमेंट किती द्यायचे आणि किती कर्ज घ्यायचं याचा अंदाज तुम्हाला लावता येईल. तुमच्या उत्पन्नाआधारे कर्ज रक्कम निश्चित करता येईल. तुमचं महिन्याचं बजेट कोलमडणार नाही, या बेताने कार लोन घेऊ शकता. त्याआधारे तुम्हाला झेपणारा EMI ठरु शकतो. त्यामुळे कार लोनसाठी तुम्हाला काटकसर करण्याची गरज पडणार नाही.
कालावधी महत्वाचा
चारचाकीसाठी कर्ज घेताना, कर्ज परतफेडीचा कालावधी लक्षात ठेवा. म्हणजेच किती महिन्यांत तुम्ही कर्जाची परतफेड करणार ते लक्षात घ्या. कर्ज घेताना परतफेडीचा कालावधी फार महत्वाचा असतो. तो कालावधी जेवढा जास्त ठेवला, तेवढे व्याज जास्त द्यावे लागेल. त्यासाठी ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करु शकता. त्यामुळे तुम्हाला कर्जापोटी नेमकी किती रक्कम तुम्हाला मोजावी लागेल याचा अंदाज बांधता येईल.
ऑफरकडे लक्ष ठेवा
कर्जासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्रता. वाहन कर्ज घेताना तुम्ही बँकेचे निकष पूर्ण करताय की नाही, याची तपासणी करुन घ्या. बर्याच बँका प्री-ओन्ड कार म्हणजेच सेकंड हँड कारसाठी कर्ज देत नाहीत. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी बँकेशी नेहमी सर्वोत्तम डीलबद्दल बोला. सध्या, अनेक बँका तुमची पात्रता आणि मॉडेलवर अवलंबून कार कर्जासाठी अनेक योजना ऑफर करतात. विशेषत: अनेक बँकांच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी, सीएनजी कारसाठी स्वतंत्र कर्ज योजना आहेत.
चांगला क्रेडिट स्कोअर म्हणजे स्वस्त कर्ज
खरा तर हा खेळ क्रेडिट स्कोअरचा आहे. तुम्ही यापूर्वी कर्ज घेऊन वेळेत, हप्ता न चुकवता कर्जाची परतफेड केली असेल तर तुमच्यावरील बँकेचा विश्वास अधिक पक्का होतो. जर ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँक गरजेनुसार कर्जाची रक्कम मंजूर करते. एवढंच नाही तर कर्जाच्या व्याजातही सवलत मिळते. अथवा प्रक्रिया शुल्क आणि इतर अवांतर शुल्क माफ करण्यात येते. तसेच सिक्युरिटीपोटी घेण्यात येणारी अनेक कागदपत्रे ही देण्याची गरज नसते.