CNG चे ही पेट्रोल-डिझेलच्या पावलावर पाऊल, मुंबईत भाव 67 रुपयांवर
सीएनजीच्या किंमतींनी ही पेट्रोल-डिझेलच्या पाऊलावर पाऊल टाकत आगेकूच केली आहे. देशभरात सीएनजीच्या किंमतींचा भडका उडाला आहे. एकीकडे इंधन दरवाढ दुसरीकडे गॅसच्या ही किंमतीत सरकारने वाढ केल्याने चाकरमानी रडकुंडीला आला आहे.
मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी (Petrol-diesel Prices) सर्वसामान्य नागरीक मेटाकुटीला आला असतानाच आता सीएनजीने या दर वाढीत उडी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची एकाचवेळी अनेक ठिकाणी परीक्षा पाहण्यात येत आहे. इंधन दरवाढ पाठोपाठ गॅस दरवाढ झाल्याने नागरीकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. वाढते दर कधी थांबतील की नाही, या दरवृद्धीला ब्रेक लागेल की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दिल्ली, गुजरातनंतर आता मुंबईतही सीएनजीचे भाव (CNG Rate) वाढले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे दरवाढ केल्याचे कारण या दरवाढीसाठी देण्यात येत असले तरी, यापूर्वी दर वाढवले होते, त्यावेळी कोणते युद्ध सुरु होते, असा सवाल नागरिकांनी विचारला आहे. सरकारने इनपुट नॅचरल गॅस किंमतीत (Input Natural Gas Price) प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे किरकोळ विक्रीतही दर वाढ दिसून येत आहे.
महानगर गॅस लिमिटेडने (MGL) कम्प्रेसड नॅचरल गॅसच्या (CNG) दरात एका फटक्यात 7 रुपयांची वाढ केली. मुंबईत एक किलो सीएनजी आता 67 रुपयांनी विक्री होत आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये एक किलो सीएनजीची किंमत 48.95 रुपये होती. जुलै 2021 मध्ये या किंमतीत एक-दीड रुपयांची वाढ झाली आणि किंमती 49.40 रुपये झाली. त्यानंतर किंमतींत सलग वाढ झाली आहे. म्हणजे गेल्या वर्षभरात किंमतीत 17 रुपयांची भरभक्कम वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजी गॅसची किंमत प्रति किलो 62.20 रुपये होती. ती सुधारित किंमतीनुसार 68 रुपये प्रति किलो झाली आहे. 1 एप्रिलपासून राज्य सरकारने सीएनजीवर व्हॅट मध्ये 6 रुपयांची कपात केली होती. पण ही कपात चाकरमान्यांच्या पथ्यावर काही पडली नाही.
PNG च्या किंमतीत वाढ
एमजीएलच्या माहितीनुसार, मुंबईत घरगुती स्वयंपाकाच्या गॅससाठी पीएनजी गॅस वापरण्यात येतो. त्याच्या किंमतीत वाढ होऊ तो सध्या 41 रुपये प्रति क्युबिक मीटर या दराने मिळत आहे. गुजरातेत पीएनजीच्या किंमतीत सध्या काहीच बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत पीएनजीच्या किंमतीत 41.61 रुपये प्रति घन मीटर आहेत. वॅट आणि स्थानिक कर आकारणीमुळे प्रत्येक शहरात गॅसच्या किंमतीत फरक दिसून येत आहे. मुंबई आणि जवळपासच्या परिसरात सीएनजीची किरकोळ किंमत 6 रुपये 60 पैसे प्रति किलोग्राम आणि पीएनजीच्या किंमती 3.50 ते 36 रुपयादरम्यान प्रति मानक क्युबिक मीटर ची कपात करण्यात आली होती. पण 1 एप्रिलपासून नॅचरल गॅसच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. या किंमतीत 6.1 डॉलर प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिटची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर सरकारने या किंमतीत वाढ केली आहे.
इतर बातम्या
रेल्वेची ‘सॅलरी एक्स्प्रेस’ सुसाट! 34% डीएची रक्कम खात्यात कधी जमा होणार? उत्तर मिळालंय!