दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या, खाद्यतेलाचे दरही कडाडले! नेमकी किती दरवाढ?
नुकतेच सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढले होते, त्यानंतर आता महागाईचे एकावर एक झटके सर्वसामान्यांना बसत आहेत.
हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई : ऐन सणासुदीच्या (Festival) तोंडावर पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा (Inflation) झटका बसलाय. दिवाळीआधी डाळींच्या किंमती वाढल्या आहेत. तूर डाळीचा (Tur Daal) भाव गेल्या आठवड्याभरात चार ते पाच रुपयांनी वाढलाय. त्यासोबत उडीद डाळ आणि खाद्य तेलाच्या किंमतीतही वाढ नोंदवण्यात आलीय. ठोक बाजारसह किरकोळ बाजारावरही डाळींच्या किंमतींचा परिणाम जाणवू लागला आहे. उत्पादन घटण्याच्या भीतीने डाळींची दरवाढ सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.
गेल्या आठ दिवसांमध्ये तूर डाळीच्या किंमतीत चार ते पाच रुपयांची वाढ झाली. सध्या तूर डाळीचा ठोक बाजारातील दर हा 110 रुपये प्रति किलो झाला आहे. तर किरकोळ बाजारात तूर डाळीची किंमत 125 ते 130 रुपये किलो इतकी झाली आहे.
उडीद डाळ 97 ते 100 रुपये किलो इतक्या दराने मिळत होती. मात्र ऐन दिवाळीआधी उडीद डाळीचा दर 105 ते 110 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वाढलेल्या दरांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे डाळीच्या पिकांना मोठा फटका बसलाय. डाळीच्या पिकांचं पावसात अतोनात नुकसान झालं. येत्या काळात डाळींचं पिकं घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळींचे दर वाढण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे.
एकीकडे रुपयांचं मूल्यही घसरतंय. तसंच खाद्यतेलाच्या किंमतीही वाढण्याची भीती आहे. खाद्यतेल 3 ते 4 रुपयांनी महागलंय. यात आणखी वाढही होण्याची भीती व्यक्त केली जातेय.
दरम्यान, सीएनजीसह पीएनजीच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली होती. या सगळ्याचा परिणाम सामान्यांच्या थेट जगण्यावर होतो आहे. सीएनजीचे दर वाढल्यामुळे दळणवळण महागलंय. त्यामुळे भाज्या, शेतीचा माल, या सगळ्यासोबत इतर सर्व मालाची ने-आणदेखील महागली आहे.
दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या दरवाढीने डोकेदुखी वाढवली आहे. अशातच ऐन सणासुदीच्या काळात आता डाळीदेखील महागल्याने चिंता व्यक्त केली जातेय.