तुमच्या घरातील एसी,वॉशिंग मशीनची दुरुस्ती करेल Flipkart; ग्राहकांसाठी कंपनीचे ई-कॉमर्सनंतर सेवा क्षेत्रात पाऊल
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट एसी, वॉशिंग मशीन विक्रीसोबतच आता त्याची दुरुस्ती पण करेल. या प्लॅटफॉर्मने सेवा क्षेत्रातही दमदार पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सेवा क्षेत्रात नवीन रोजागाराच्या संधी ही मिळतील आणि कुशल कामगारांना रोजगार मिळेल.
ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने (Flipkart) एअर कंडिशनर (AC) , वॉशिंग मशीनसह इतर होम अप्लायंसेसच्या (Home Appliances) विक्रीसह सेवा क्षेत्रातही दमदार पाऊल ठेवले आहे. तुमच्या घरातील एसी आणि इतर होम अप्लायंसेच्या दुरुस्तीचा कारभारही फ्लिपकार्टने हाती घेतला आहे. विशेष म्हणजे तुम्ही फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्म ऐवजी इतर ठिकाणाहून ही तुम्ही या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या असल्या तरी ही फ्लिपकार्ट त्याची दुरुस्ती आणि देखभाल (Repairing and service) करणार आहे. सुरुवातीच्या काळात ही सुविधा बंगळुरु आणि कोलकत्ता शहरात सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर या योजनेचा विस्तार देशातील इतर शहरात करण्यात येणार आहे. या सेवेमुळे या क्षेत्रातील लोकांसमोर आव्हान उभे ठाकणार आहे, तर कुशल मनुष्यबळाला चांगला रोजगार ही प्राप्त होणार आहे. फ्लिपकार्टच्या रुपाने सेवा क्षेत्रात (Service Sector) क्रांतीची नांदी उभी ठाकली आहे. सेवा क्षेत्रात दर्जेदार काम आणि कमी दाम या संकल्पनेला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Jeeves च्या माध्यमातून सेवा
यापू्वी फ्लिपकार्टने उपकंपनी Jeeves च्या माध्यमातून सेवा उद्योगात पाऊल ठेवले होते. फ्लिपकार्टने 2014 मध्ये अफ्टर सेल्स सर्व्हिस कंपनी Jeeves चे अधिग्रहण केले होते. तेव्हापासून कंपनी Jeeves च्या माध्यमातून होम एप्लायन्सेस इंस्टॉलेशनची सेवा देत होती.
सुविधेसाठी करावी लागेल ऑनलाईन नोंदणी
फ्लिपकार्टच्या या सुविधेसाठी ग्राहकाला ऑनलाईन बुकिंग करावी लागणार आहे. सध्या अर्बन कंपनी या प्रकारची सेवा उपलब्ध करुन देते. फ्लिपकार्टच्या रुपाने अर्बन कंपनीला बाजारात मोठा प्रतिस्पर्धी मिळाला आहे. वास्तविक, अर्बन कंपनी दुस-या अनेक सेवा घरपोच देते. त्यात सौंदर्य विषयक सेवा, जसे की, फेशियल, मसाज, हेअरकट अशा सुविधा देते. फ्लिपकार्ट अजून या सेवा प्रकारात उतरलेली नाही. घरपोच सेवेचे क्षेत्र आव्हानात्मक आहे. भारतात जस्ट डायल आणि सुलेखा सारख्या अनेक कंपन्यांनी सर्वात अगोदर याप्रकारची सेवा सुरु केली होती. या दोन्ही कंपन्या स्थानिक पातळीवरील सेवा पुरवठादारांची नावे आणि पत्ता ग्राहकांना देतो. त्यासाठी त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन सर्च पर्याय निवडून सेवा पुरवठादारांची यादी समोर येते. त्यातील जवळचा सेवेदार तुम्हाला निवडता येतो.
यापुढे पाऊल ठेवत सेवापुरवठादारांची यादी न देता या सेवाच ग्राहकांना घरपोच पोहचविण्याचा विडा Housejoy आणि अर्बन कंपन्यांनी उचलला आणि त्यात या कंपन्या यशस्वी पण झाल्या. त्यामुळे बाजाराचे अर्थचक्र फिरले. या यशाचे परिमाण तपासत इतर काही स्टार्टअपने ही नशीब आजमावले. पण त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी इतर सेवा क्षेत्राकडे मोर्चा वळविला.