Gold Price Today: सोन्याच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचा दर
Gold price | एसपीडीआरकडे गेल्या दोन वर्षांमध्ये असणारा हा सर्वात कमी सोन्याचा साठा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळू शकते.
मुंबई: गणेशोत्सव जवळ आल्यामुळे सध्या अनेकजण गणपतीसाठी लहान किंवा मोठे अलंकार तयार करवून घेण्याच्या विचारात असतील. त्यादृष्टीने सोमवारी चांगली संधी चालून आली आहे. कारण, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वायदा बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही होतो. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव तोळ्यामागे 0.18 टक्क्यांनी घसरला. तर चांदीचा भाव मात्र 0.34 टक्क्यांनी वधारला.
गेल्या सत्रात सोन्याच्या भावाने 500 रुपयांची उसळी घेत एका महिन्यातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. परंतु, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा दर पुन्हा खाली आला आहे. त्यामुळे एक तोळा सोन्याची किंमत 47,440 रुपये इतकी झाली आहे. तर चांदीचा भाव 221 रुपयांनी वाढून 65,430 च्या पातळीवर पोहोचला आहे.
आगामी काळात सोनं स्वस्त होणार?
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, जगातील सर्वात मोठी ईटीएफ असलेल्या एसपीडीआर होल्डिंग्सकडून (SPDR Gold Trust) खुल्या बाजारपेठेत सोन्याची विक्री केली आहे. एकाच दिवसातील ही सर्वाधिक सोने विक्री होती. त्यामुळे एसपीडीआर होल्डिंग्सकडील सोन्याचा साठा 998.52 टनापर्यंत खाली आला आहे. एसपीडीआरकडे गेल्या दोन वर्षांमध्ये असणारा हा सर्वात कमी सोन्याचा साठा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळू शकते.
अल्पकालावधीत सोन्याचा भाव 42 हजारापर्यंत खाली येऊ शकतो, असा अंदाज आहे. भारतामध्ये बऱ्यापैकी लसीकरण झाले आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी गुंतवणुकदार आपला मोर्चा सोन्याऐवीज पुन्हा भांडवली बाजाराकडे वळवतील. त्यामुळेही सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळू शकते.
घरात पडून असलेलं सोनं बँकेत ठेवून पैसे कमावण्याची संधी
अलीकडच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असूनही पारंपरिक विचारसरणीचे भारतीय लोक सोन्यात गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. प्रत्येक सणाला थोडंफार सोनं खरेदी केलं जातं. मात्र, यापैकी बहुतांश सोनं वर्षानुवर्षे कपाटाच्या लॉकरमध्ये पडून राहते. त्यावर कोणताही परतावा मिळत नाही. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक काहीप्रमाणात डेड इन्व्हेस्टमेंट मानली जाते.
मात्र, आता पंजाब नॅशनल बँकेने (PNB) घरातील सोन्यावर पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. PNB बँकेच्या Gold Monetization Scheme मध्ये सोनं ठेवून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.
सोने चोरीला जाण्याची जोखीम असल्यामुळे अनेकजण ते बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवतात. त्यासाठी तुम्हाला बँकेला शुल्क अदा करावे लागते. मात्र, तुम्ही PNB बँकेच्या सोने चलनीकरण योजनेतंर्गत गुंतवणूक करायची ठरवली तर तुमच्या सोन्याच्या दागिन्यांसाठी वेगळे बँक लॉकर खरेदी करण्याची गरज उरणार नाही. तसेच तुम्हाला ठराविक व्याजही मिळत राहील. या योजनेत तुम्ही अगदी एक तोळा सोनेही गुंतवू शकता. PNB बँकेच्या Gold Monetization Scheme मध्ये तीन प्रकार आहेत. शॉर्ट टर्म बँक डिपॉझिटमध्ये (STBD) 1 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी तुम्ही सोनं बँकेत गुंतवू शकता. तर मध्यम आणि दीर्घकालीन Gold Monetization Scheme चा कालावधी अनुक्रमे 5 ते 7 वर्षे आणि 12 ते 15 वर्षे इतका आहे.