IT Sector: हे दादा शेअर नीचांकी पातळीवर, गुंतवणुकीची संधी चुकवू नका
गेल्या तीन आठवड्यांपासून शेअर बाजारात कमालीची उलटापालट होत आहे. अशावेळी आयटी क्षेत्रात ही गुंतवणुकीच्या काही संधी चालून आल्या आहेत. सध्याच्या बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील या शेअरमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकतो.
जर तुम्ही शेअर बाजारातील टॉप भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ते आता फायद्याचे ठरू शकते. खरेतर, सध्याच्या बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस (Infosys) आणि विप्रो (Wipro)या आघाडीच्या भारतीय आयटी कंपनीच्या शेअर्सच्या (IT Company Share) किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. बुधवारी आयटी क्षेत्रातील कंपन्यांना चांगली कामगिरी दाखविता आली नाही. अनेक आयटी कंपन्यांच्या शेअर त्यांच्या निचांकी पातळीवर आहेत. त्यामुळे ही घसरण गुंतवणुकदारांसाठी गुंतवणुकीची चांगली संधी आहे. बाजार सध्या घसरणीच्या स्थितीत असला तरी तो वधरणार आहेच. बाजारात चढउताराचं चक्र सुरु असते. त्यामुळे आता घसरणीला लागलेला बाजार पुन्हा उसळी घेईल आणि तुम्ही योग्य वेळी केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदा मिळवून देईल. दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुंतवणुकदारांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तगड्या कंपन्या मदत करु शकतात. तेव्हा अशा संधीवर गुंतवणुकदारांनी लक्ष ठेऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो.
जागतिक घडामोडींचा परिणाम
रशिया-युक्रेन संघर्ष, कोविडनंतरची परिस्थिती याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थांवर झाला आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकन फेडरल बँकेने एक आठवड्यापूर्वी रेपो रेट वाढवला. त्याचा परिणाम ही दिसून आला. डॉलर मजबूत होत असताना सोन्याच्या किंमती कमी होत आहे. शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून घसरण होते आहे. त्यामुळे अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खालच्या स्तरावर आले आहेत. परदेशी गुंतवणुकदार ही बाजारातून पैसे काढून घेत आहेत.
हे शेअर 52 आठवड्यांच्या निच्चांकी पातळीवर
बाजारातील घसरणीचा फायदा उचलण्याची ही योग्य वेळ आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS),विप्रो (Wipro) आणि इन्फोसिस (Infosys) या आघाडीच्या भारतीय आयटी कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. गेल्या 52 आठवड्यांचा विचार करता हे शेअर निच्चांकी पातळीवर व्यापार करत आहेत. यामध्ये TCS कंपनीचे शेअर्स यावर्षात सुमारे 18% खाली आले आहेत. तर बाजारातील दुसरी कंपनी Infosys चे शेअर्स तब्बल 25% हून अधिक घसरले आहेत. यासह विप्रोचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत 42.08% घसरले आहेत. विप्रोचा शेअर सध्या 415.80 रुपयांना आहे. TCS च्या शेअर्सची किंमत आज 3,231.40 आहे. तर इन्फोसिस कंपनीच्या शेअरची किंमत 1,436.90 रुपये आहे तर विप्रोचा शेअर आज 411.80 रुपये आहे.
या शेअरची दमदार कामगिरी
मोतीलाल ओसवाल यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कंपन्या दिमाखदार कामगिरी करतील अशी शक्यता वर्तवली आहे. TCS आणि Infosys हे दोन्ही शेअर चागंली कामगिरी करतील अशी शक्यता आहे. ओसवाल ब्रोकरेज फर्मने TCS साठी 4,240 रुपये आणि Infosys साठी 2,000 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास ती फायदेशीर ठरु शकते. TCS ने आपला दीर्घकालीन फायदा हा 26-28% वर कायम ठेवला आहे.गेल्या आर्थिक वर्षात दोन्ही कंपन्यांनी योग्य माणसांना प्रशासकीय पदावर नियुक्त केले आहे. त्याचे परिणाम ही दिसून येत आहे.