आधार कार्डला व्होटर आयडी लिंक केले नाही तर काय होणार?; मतदान करता येणार की नाही?
जर एखाद्याचं आधार कार्ड व्होटर आयडीशी लिंक नसेल तर मतदान करण्यासाठी त्या व्यक्तिला इतर कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत. फॉर्म 6-B मध्ये म्हटलं आहे की, माझ्याकडे आधार नंबर नाही.
नवी दिल्ली: मतदान कार्ड (व्होटर आयडी) आधार कार्डला (Aadhar) लिंक करण्याचं काम सध्या जोरदार सुरू आहे. आतापर्यंत 46 कोटी लोकांनी आपलं व्होटर आयडी कार्ड (voter ID) आधारशी लिंक केलं आहे. येत्या एप्रिलपर्यंत देशातील सर्वांचे व्होटर आयडी कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचं सरकारने टार्गेट ठेवलं आहे. निवडणुकीशी संबंधित कायद्यात (election laws) बदल करण्यात आल्याने ही प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. 1 ऑगस्टपासून व्होटर आयडी आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक लोक बोगस मतदान करतात. मतदार यादीत बोगस मतदारांची नावे असतात. ही नावे काही लाखांच्या घरात आहेत. त्यामुळे ही बोगसगिरी रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने व्होटर आयडीला आधारशी लिंक करण्याचा मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
लोकांना व्होटर आयडीला आधार कार्डशी संलग्न करता यावे म्हणून देशातील प्रत्येक विधानसभेत स्पेशल कॅम्प तयार करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीत 70 विधानसभा मतदारसंघात 2684 कॅम्प तयार करण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये जाऊन लोक आपलं व्होटर कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकतात. तसेच व्होटर आयडी तयार केलेले नसेल तर तेही तुम्ही तयार करू शकता.
असं का?
2015 मध्ये निवडणूक आयोगाने व्होटर आयडी कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याचं काम सुरू केलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती.
त्यानंतर 2019मध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी व्होटर आयडीला आधारकार्डाशी लिंक करण्याची शिफारस केली होती.
निवडणूक आयोगाच्या शिफारशी नंतर मोदी सरकारने निवडणूक कायद्यातील दुरुस्तीचं विधेयक आणलं होतं. हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता व्होटर आयडी कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोदी सरकारच्या या कायद्याला काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता.
व्होटर आयडी- आधार लिंक केल्याने काय होईल?
एक व्यक्ती अनेक व्होटर लिस्टमध्ये आपलं नाव टाकत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे मतदानावेळी गडबड होते. अशा प्रकारची बोगस व्होटिंग रोखण्यासाठीच व्होटर कार्ड आता आधारला लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बऱ्याच वेळी अनेक लोक एकापेक्षा अधिक व्होटर आयडीही तयार करतात. पण आधार कार्ड एकच आहे. त्यामुळे आधार कार्डला व्होटर आयडी लिंक केल्यास एका व्यक्तीकडे एक व्होटर आयडी राहील. तसेच बोगस व्होटर आयडी बनविण्याचे प्रकारही थांबतील.
निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील लाखो मतदारांचे एकापेक्षा अधिक मतदार यादीत नावे आहेत. त्यामुळे बोगस व्होटिंग होतं. त्यामुळे मतदानाच खरा टक्का कळत नाही.
आधार लिंक करायचे नसेल तर?
प्रत्येक मतदाराला आपल्या मतदान कार्डाला आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक असल्याचं कायद्यात स्पष्टपणे म्हटलं आहे. मात्र, कुणाकडे आधार कार्ड नसेल तर त्याला मतदानापासून वंचित ठेवलं जाणार नाही, असंही या कायद्यात म्हटलं आहे.
व्होटर आयडी कार्ड हे आधारला लिंक करणं वैकल्पिक असल्याचं, कायदा मंत्री किरन रिजिजू यांनी संसदेत बिल सादर करताना म्हटलं होतं. एखाद्या व्यक्तिला वाटलं तर त्याच्या व्होटर आयडीला आधार कार्डशी लिंक केलं जाईल, असंही त्यांनी म्हटलं होतं.
संपूर्ण कागदपत्रे द्यावी लागणार
जर एखाद्याचं आधार कार्ड व्होटर आयडीशी लिंक नसेल तर मतदान करण्यासाठी त्या व्यक्तिला इतर कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत. फॉर्म 6-B मध्ये म्हटलं आहे की, माझ्याकडे आधार नंबर नाही. त्यामुळे मी त्याला लिंक करू शकत नाही. म्हणजेच तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही दुसरे दस्ताऐवज देऊ शकता.
आधार कार्ड नसेल तर रोजगार हमी योजनेचं जॉब कार्ड, बँक पासबूक, हेल्थ विमा कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन डॉक्यूमेंट, सर्व्हिस आयडी कार्ड, ऑफिशियल आयडी कार्ड आणि सामाजिक न्याय मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेलं युनिक आयडेंटिटी कार्ड द्यावं लागणार आहे.