LIC PLAN : गुंतवणूक वन-टाइम, पेन्शन लाईफटाईम; एलआयसीची ही लोकप्रिय पॉलिसी चुकवू नका
एलआयसी सरल पेन्शन योजनेत निवृत्तीवेतन मिळविण्याचे चार पर्याय आहेत. पॉलिसीधारक मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर पेन्शन घेऊ शकतात.

नवी दिल्ली : मनासारखं परिपूर्ण आयुष्य जगता यावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. आयुष्याची संध्याकाळ आनंदात घालविता यावी यासाठी प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. तुम्ही देखील निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे प्लॅनिंग करत असल्यास तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत मोलाची ठरू शकते. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (Life Insurance Corporation) सरल पेन्शन पॉलिसी अंतर्गत पॉलिसीधारक सिंगल प्रीमियम भरू शकतात. म्हणजे केवळ एकदाच प्रीमियम भरुन पॉलिसीधारकाला आयुष्यभरासाठी निवृत्तीवेतनाचा (Pension for Retirement) लाभ घेता येऊ शकतो. तुम्ही पॉलिसीचा लाभ दोन प्रकारे घेऊ शकतात- सिंगल लाईफ पॉलिसी (Single Life Policy) आणि जॉईंट लाईफ पॉलिसी. पॉलिसीचा लाभ नेमका कसा घ्यावा? आवश्यक कागदपत्रे व अटी कोणत्या? सर्वकाही जाणून घ्या-
दोन प्रकारे लाभ :
सिंगल लाईफ पॉलिसी
यामध्ये पॉलिसी एका व्यक्तीच्या नावे राहील. पॉलिसीधारक हयात असेपर्यंत पेन्शन स्वरुपात रक्कम त्याला प्राप्त होईल. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर बेस प्रीमियमची रक्कम नॉमिनीच्या खात्यात वर्ग केले जाईल.
जॉईंट लाईफ पॉलिसी
यामध्ये पती व पत्नी दोघांच्या नावे संयुक्तपणे पॉलिसी असेल. दोघांपैकी हयात असणाऱ्या व्यक्तीला निवृत्तीवेतन रक्कम प्राप्त होईल. पतीच्या मृत्यूनंतर निवृत्तीवेतनाची पूर्ण रक्कम पत्नीच्या खात्यावर वर्ग केली जाईल. यासोबतच पेन्शनच्या रकमेत कोणत्याही प्रकारे कपात केली जाणार नाही. पती आणि पत्नी दोघांच्या मृत्यूनंतर नॉमिनीच्या खात्यात बेस प्राईस वर्ग केली जाईल. एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अप्लाय केले जाऊ शकते.
पेन्शनचे चार पर्याय
एलआयसी सरल पेन्शन योजनेत निवृत्तीवेतन मिळविण्याचे चार पर्याय आहेत. पॉलिसीधारक मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर पेन्शन घेऊ शकतात. मासिक पेन्शन मूल्य किमान 1000 रुपये, तिमाही किमान 3,000 रुपये, सहामाही किमान 6,000 रुपये वार्षिक किमान 12,000 रुपयांची असेल. कमाल पेन्शन रकमेची कोणतीही मर्यादा नाही.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
>> एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जा. सरल पेन्शन योजनेवर क्लिक करा
>> अप्लाय करा वर क्लिक करा
>> वेबसाईटवरील अर्जाचा संपूर्ण तपशील भरुन. आवश्यक कागदपत्रे जोडा
>> संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन सबमिट वर क्लिक करा
ऑफलाईन अर्ज कसा करावा?
- तुमच्या नजीकच्या इन्श्युरन्स कार्यालयात जा
- सरल पेन्शन योजनेचा फॉर्म प्राप्त करा
- अर्जावरील संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा
- आवश्यक कागदपत्रांसह इन्श्युरन्स कार्यालयात अर्ज दाखल करा
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, बँक अकाउंट, रेशनकार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, मोबाईल नंबर इ. कागदपत्रांची आवश्यकता असेल.