रात्री झोपताना स्मार्टफोन आपल्यापासून किती लांब हवा, जाणून घ्या महत्वाची कारणे
अनेक जण रात्री झोपताना मोबाईल आपल्याजवळ ठेऊन झोपतात. रात्री एखादा फोन झाल्यास उठावे लागू नये, यामुळे मोबाईल उशीखाली किंवा आपल्याजवळच ठेवला जातो. परंतु मोबाईल आपल्याजवळ ठेवणे घातक आहे.
स्मार्टफोन प्रत्येक घरात नाही तर प्रत्येकाच्या हातात आला आहे. हा स्मार्टफोन 24 तास जवळच असतो. काही वेळ मोबाईलपासून काही जण दूर राहू शकत नाही. अनेक जण रात्री झोपताना मोबाईल आपल्याजवळ ठेऊन झोपतात. रात्री एखादा फोन झाल्यास उठावे लागू नये, यामुळे मोबाईल उशीखाली किंवा आपल्याजवळच ठेवला जातो. परंतु मोबाईल आपल्याजवळ ठेवणे घातक आहे. रात्री मोबाईल आपल्याजवळ ठेवणे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. तुम्हाला हा धोका टाळायचा असेल तर मोबाईल आपल्यापासून 3 ते 4 फूट लांब ठेवणे आवश्यक आहे.
मोबाईल जवळ ठेवल्यास काय आहेत धोके?
- झोपेत अडथळा: स्मार्टफोनमधील निळा रंग मेलाटोनिनच्या उत्पादनासाठी बाधक ठरतो. मेलोटोनिन रात्रीच्या वेळी मेंदूमध्ये स्रावित होणारे संप्रेरक आहे. झोपेच्या नियमनात त्याची भूमिका महत्वाची असते. मोबाईलमधील निळा रंग मलाटोनिनवर प्रभाव करतो. त्यामुळे शांत आणि गाढ झोप लागत नाही. तसेच फोनचे नोटिफिकेशन आणि अलर्ट्स झोपेत अडथळा ठरतात.
- आग लागण्याचा धोका : स्मार्टफोन उशीखाली ठेवल्यास उष्णता तयार होते. त्यामुळे फोन गरम होऊ शकतो. तसेच आग लागण्याचा धोका असतो. तसेच फोनच्या नोटिफिकेशनमधील व्हायब्रेशनमुळे तुमची झोप मोडली जाते.
- मानसिक तनाव : स्मार्टफोनचा सतत वापर मानसिक तणाव आणि चिंतेचे कारण बनू शकतो. रात्री जवळ ठेऊन झोपल्यामुळे मनाला पूर्णपणे आराम मिळत नाही. त्यामुळे सकाळी तुम्ही वैतागलेले असतात. संपूर्ण दिवस तणावात राहतात.
- आरोग्याच्या समस्या : दीर्घकाळ स्मार्टफोनच्या जवळ राहिल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. डोळ्यात जळजळ होणे, डोके दुखणे, कान दुखणे यासारखे प्रकार होतात. स्मार्टफोन लांब ठेवून झोपल्यामुळे तुमची झोपच चांगली होते, असे नाही तर आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. यामुळे चांगली झोप आणि चांगल्या आरोग्यासाठी स्मार्टफोन आपल्यापासून लांब ठेवून झोपणेच फायदेशीर आहे.
Non Stop LIVE Update