Swadhar Scheme : तुमच्या शिक्षणासाठी राज्य सरकारचा आधार! शिक्षण, इतर खर्चासाठी स्वधार, इतक्या हजारांची मदत
Swadhar Scheme : तरुणांच्या शिक्षणासाठी राज्य सरकार इतक्या हजारांची मदत देते..
मुंबई : शालेय शिक्षणानंतर पुढील अभ्यासक्रमासाठी(Education) राज्य सरकारचं (State Government) पाठबळ मिळते, हे कदाचित अनेक तरुणांना (Youth) माहिती नाही. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दूरच्या शहरात जातात. त्याठिकाणी राहण्याचा-खाण्याचा आणि शिक्षणाचा मोठा खर्च (Expenditure) येतो. हा खर्च भागविणे अवघड असते, अशावेळी राज्य सरकारची ही योजना मदतीला येते.
शहरात आलेल्या या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने स्वधार योजना (Swadhar Yojana) आणली आहे. या योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण, राहण्याचा-खाण्याचा खर्च भागविण्यासाठी मदत करण्यात येते. राज्य सरकार 51 हजार रुपयांची आर्थिक मदत देते.
राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना आणली आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश मिळतो. पण अनेकदा विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होतो.
स्वधार योजनेचा फायदा आर्थिकदृष्ट्या गरीब, अनूसुचित जाती, जमाती, आदिवासी, नवबौद्ध या श्रेणीतील विद्यार्थ्यांना मिळतो. कमीत कमी इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळतो.
त्याआधारे या विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी, 12वी, डिप्लोमा कोर्स, अव्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी मदत करण्यात येते. राज्य सरकार विद्यार्थ्यांना 51 हजारांचे आर्थिक सहाय्य करते.
योजनेसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी जो अभ्यासक्रम निवडला जाईल, त्याचा कालावधी दोन वर्षांपेक्षा अधिकचा नसावा.
कमीत कमी 60 टक्के गुण प्राप्त विद्यार्थ्यांचाच या योजनेसाठी विचार करण्यात येतो. अपंग विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. योजनेतील रक्कमेसाठी विद्यार्थ्याकडे स्वतःचे खाते असणे आवश्यक आहे.
या योजनेतंर्गत विविध रक्कम देण्यात येते. बोर्डिंग सुविधेसाठी 28 हजार रुपये, लॉजिंग सुविधेसाठी 15 हजार रुपये मदत देण्यात येते. वैद्यकिय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची अतिरिक्त मदत देण्यात येते.