Tax on Sale of Property : घर विक्रीची तयारी? कर किती द्यावा लागेल याची ही करुन घ्या माहिती
Tax on Sale of Property : कराचे गणितच न्यारे आहे भावा..
नवी दिल्ली : नवीन वर्षात तुमचे राहते घर विक्री (Sale of Property) करण्याचा विचार करत आहात काय? तर तुम्हाला त्याच्या करासंबंधीचा नियमही माहिती करुन घ्यावा लागेल. घर विक्रीनंतर जी रक्कम तुम्हाला मिळते. त्यावर तुम्हाला कर मोजावा लागतो. प्राप्तिकर खात्याच्या कायद्यानुसार (Income Tax Act), मालमत्ता विक्रीनंतर त्यावर कर देणे बंधनकारक आहे. आता संपत्तीसंबंधीच्या व्यवहारात तुम्हाला फायदा असो वा तोटा होवो, कर तर द्यावाच लागतो.
हा कर तुम्हाला कॅपिटल गेन (Capital Gains) अंतर्गत द्यावा लागतो. याला कॅपिटल गेन्स टॅक्स (Capital Gains Tax) असे नाव आहे. मालमत्ता विक्रीनंतर भली मोठी रक्कम तुमच्या हातात येते. या रक्कमेवर हा कर अदा करावा लागतो.
या कॅपिटल गेन्स टॅक्समध्येपण काही तरतुदी आहेत. तुम्ही घर खरेदी करुन 24 महिन्यानंतर त्याची विक्री केली. म्हणजेच दोन वर्षांनी राहते घर विक्री केले तर जो कर द्यावा लागणार आहे, त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन्स (Long Term Capital Gains) असे म्हणतात.
तर या दीर्घकालीन संपत्तीवर तुम्हाला किती कर मोजावा लागेल याची माहिती घेऊयात. तर या विक्रीतून जी रक्कम तुम्ही कमवाल त्यावर 20 टक्के कर मोजावा लागेल. पण यामध्ये तुम्हाला दिलासा मिळू शकतो. तुम्हाला प्राप्तिकर रिटर्न फाईल करताना कर सवलतीचा दावा दाखल करता येईल.
दोन वर्षांतच तुम्ही घर खरेदी करुन त्याची विक्री केली. या व्यवहारातून तुम्हाला फायदा झाला असे गृहित धरण्यात येते. हा व्यवहार तुमच्या उत्पन्नाची हिस्सा मानण्यात येतो. कर श्रेणीनुसार, तुमच्या कराची गणना करण्यात येते. त्यानुसार कर मोजावा लागतो.
समजा तुम्ही घर खरेदी केले. त्यानंतर तुम्ही कर सवलतीसाठी नियम 80C अंतर्गत दावा दाखल केला आणि त्याचा फायदा घेतला. पाच वर्षानंतर तुम्ही घर विक्री केली तर आता तुम्हाला मिळालेली कर सवलत ही तुम्हाला झालेल्या फायद्यातून अशा प्रकारे वसूल करण्यात येते.
पण याठिकाणी आणखी एक फायद्याचे गणित आहे. तुम्ही तुमचे राहते घर विक्री केले. त्यावर कॅपिटल गेन टॅक्सही भरला. पण त्याच कालावधीत तुम्ही नवीन घर खरेदी केले तर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स कमी करुन घेण्याचा हक्क मिळतो.
अशा प्रकारात तुम्हाला प्राप्तिकर कायद्याच्या कलम 54 चा आधार घेता येतो. कारण नवीन घर खरेदी करण्यासाठी तुम्ही गुंतवणूक केली आहे. जुने घर विकून तुम्ही दोन वर्षाच्या आत नवीन घर घेतल्यास, तुम्हाला हा फायदा मिळू शकतो. पण घराचे बांधकाम सुरु असेल तर जास्तीत जास्त एक वर्षाचा अतिरिक्त कालावधी मिळू शकतो.