500 Note : स्टार चिन्हाची 500 रुपयांची नोट आहे का खोटी? केंद्र सरकारने दिले हे उत्तर
500 Note : 500 रुपयांमागील शुक्लकाष्ठ संपता संपेना. या स्टार चिन्ह असलेल्या नोटेवरुन सध्या वादंग पेटले आहे. ही नोट खरी आहे की खोटी, याविषयी नागरिकांमध्ये संभ्रम आहे. केंद्र सरकारने त्यावर उत्तर दिले आहे.
नवी दिल्ली | 27 जुलै 2023 : सोशल मीडियावर गेल्या तीन दिवसांपासून 500 रुपयांच्या नोटेवरुन (500 Rupees Note) वादंग उठले आहे. या नोटेमागील शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नसल्याचे चित्र आहे. याविषयीची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये 500 रुपयांची एक नोट दिसत आहे. या नोटेच्या क्रमांकामध्ये एक स्टार चिन्ह (*) अंकित आहे. या पोस्टमध्ये युझरने स्टार चिन्ह (*) अंकित असलेली नोट नकली असल्याचा दावा केला आहे. या पोस्टनुसार, गेल्या काही दिवसांपासून बाजारात ही 500 रुपयांची खोटी नोट फिरत आहे. या नोटेपासून ग्राहकांनी चार हात दूर राहावे, असा इशारा या पोस्टमध्ये देण्यात आला आहे. खास करुन हातगाडी, फेरीवाल्यापासून अशा नोट न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काय खरे आणि काय आहे खोटे?
बँकेला पण ओढले वादात
500 रुपयांच्या नोटेच्या क्रमांकापूर्वी स्टार चिन्ह (*) असेल तर ही नोट खोटी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याने याविषयीचा फोटो पण शेअर केला आहे. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, इंडसइंड बँकेने आजपासून अशा 500 रुपयांच्या नोटा घेण्यास मनाई केल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. हा मॅसेज अधिक लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन पण या पोस्टमध्ये करण्यात आले आहे.
फेरीवाल्यापासून राहा सावध
या व्हायरल पोस्टमध्ये फेरीवाल्यापासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्टार चिन्ह असलेल्या 500 रुपयांच्या नोटा फेरीवाले वाटत आहेत. या नोटा खोट्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. या नोटा घेऊ नका. फेरीवाल्यापासून तर एकदम सावध राहण्याचे आवाहन या पोस्टमध्ये करण्यात आले आहे.
पीआयबीने केला खुलासा
सोशल मीडियावर 500 रुपयांच्या नोटेसंबंधीची पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर केंद्र सरकारने त्याची दखल घेतली. याप्रकरणी पत्र सूचना कार्यालयाने ट्विट केले आहे. ही पोस्ट खोटी आणि भ्रम निर्माण करणारी असल्याचा दावा पीआयबीने केला आहे. नोटेच्या सिरीयल क्रमांकाच्या दरम्यान असलेले स्टार चिन्ह आणि ती नोट वैध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
RBI ने केली होती सुरुवात
2016 नोटबंदी झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने या सारख्या नोटा जारी केल्या. त्यावेळी आरबीआयने 500 रुपयांच्या नोटांवर चिन्ह (*) अंकित केले होते, असे पीआयबीने स्पष्ट केले.
या नोटा चलनातून बाद
आरबीआयच्या संकेतस्थळानुसार, जानेवारी 1946 मध्ये पहिल्यांदा 500, 1000 आणि 10000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. 1954 मध्ये 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा जानेवरी 1978 मध्ये पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या. त्यानंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या.