औरंगाबादेत रिक्षाचा प्रवास महागणार, पेट्रोलच्या नव्या दरांनुसार मीटर दर आकारणी वाढवण्याचा प्रस्ताव, आरटीओची महत्त्वाची बैठक
यापूर्वी पेट्रोलचे दर 60 ते 70 रुपये प्रति लीटर असे होते. तेव्हा रिक्षाच्या मीटरचे असे दर ठरवण्यात आले होते. मात्र वर्तमान स्थितीत 110 रुपये प्रति लीटरपर्यंत पेट्रोलचा भाव गेला आहे.

औरंगाबाद: येत्या काही दिवसात शहरात रिक्षाचे दर वाढण्याची शक्यता आहे. औरंगाबाद रिक्षा चालक संघटनेच्या (Aurangabad Rickshaw Drivers Association) पदाधिकारी आणि आरटीओ कार्यालयातील (RTO Aurangabad) अधिकाऱ्यांची सोमवारी यासंबंधात एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत रिक्षा चालकांनी आरटीओचे नियम पाळूनच प्रवासी वाहतूक करावी, असे निर्देश देण्यात आले. रिक्षा चालकांनी गणवेश घालणे सक्तीचे असून मीटरनुसारच प्रवाशांना भाडे आकारवे, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच रिक्षा चालकांनीही सध्याचे मीटरने सुरु असलेले दर आताच्या महागाईच्या स्थितीत परवडण्यासारखे नाहीत, यासंबंधीची परिस्थिती विशद केली. तसेच रिक्षाचालकांच्या इतरही समस्या यावेळी मांडण्यात आल्या.
रिक्षाचे मीटरचे दर सध्या काय, नंतर किती वाढणार?
सध्या रिक्षा मीटरचे पहिल्या किलोमीटरसाठीचे दर 14 रुपये असे आहेत. पहिल्या किलोमीटरनंतर दुसऱ्या किलोमीटरपासून पुढील प्रवासासाठीही प्रति किलोमीटर 14 रुपये असे दर आहेत. यापूर्वी पेट्रोलचे दर 60 ते 70 रुपये प्रति लीटर असे होते. तेव्हा रिक्षाच्या मीटरचे असे दर ठरवण्यात आले होते. मात्र वर्तमान स्थितीत 110 रुपये प्रति लीटरपर्यंत पेट्रोलचा भाव गेला आहे. त्यामुळे पहिल्या एका किलोमीटरसाठी 20 रुपये तर पुढील प्रवासासाठी प्रति किलोमीटर 17 रुपये दराचा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे.
‘ओला’ प्रमाणे परिवहन विभागाचेही अॅप करण्याची मागणी
ओला, उबेरसारख्या कंपन्यांनी रिक्षा प्रवाशांसाठी अॅप तयार करुन रिक्षा चालकांना मोबाइलवर व्यवसाय उपलब्ध करून दिला आहे. परिवहन विभागानेही असेच अॅप तयार करावे. त्यामुळे कोणत्याही प्रवाशांना थेट रिक्षा बुक करता येईल. त्यामुळे रिक्षातील प्रवाशाचे नाव आणि नंबरची नोंद परिवहन विभागाकडे येईल. काही वाईट कृत्य किंवा अपघात घडल्यास त्याची नोंदही परिवहन विभागाकडे राहिल. तसेच नागरिकांनाही थेट सुविधा उपलब्ध होईल, असा प्रस्ताव रिक्षा संघटनेकडून यावेळी आरटीओ अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आला.
आधुनिक रिक्षा स्टँड करण्याचा पालिकेचा प्रस्ताव
शहरातील रिक्षा स्टँडची संख्या कमी आणि रिक्षांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे स्टँडची संख्या वाढवण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रिक्षा चालकांना रस्त्यावर उभे रहावे लागते. ही परिस्थिती रिक्षा चालकांनी आरटीओ अधिकाऱ्यांसमोर मांडली. यावेळी आरीटओ मैत्रावार यांनी रिक्षा स्टँड आधुनिक स्वरुपात तयार करून देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. आगामी काळात रिक्षा थांब्यांचा विषय लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन दिले.
इतर बातम्या-
‘भावी’ काळात ‘आजी-माजी’ एकत्र? औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संकेत
Aurangabad | औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस