प्रवासासाठी निघालात, रिचार्ज, बील भरण्याची चिंता नको; रेल्वे स्थानकावरच भरा बील, रेलटेलचा अनोखा उपक्रम
प्रवाशाच्या गडबडीत आहात आणि मोबाईलचे रिचार्ज करायचे आहे, घराचे विद्युत बिलही भरले नसेल तर, काळजी करु नका. कारण आता रेल्वे स्थानकावरील सर्व सेवा सुविधा केंद्रात तुम्हाला मोबाईलचे रिचार्ज करता येईल. विद्युत बिल भरता येईल. एवढंच काय आयकर जमा करता येईल. बँकिंग, विमा सुविधा मिळेल आणि आधारकार्ड, पॅनकार्डसाठी अर्ज ही करता येईल.
मुंबई : भारतीय रेल्वे स्थानक (Railway Satation) हायटेक करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशभरातील 200 रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या चिंता कमी करणा-या सेवा-सुविधा देण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मोबाईल रिचार्जपासून ते घराचे विद्युत बिल भरण्यापर्यंत सर्व सुविधा प्रवाशांना रेल्वेस्थानकावर उपलब्ध होतील. त्यामुळे अकारण प्रवाशांची होणारी धावपळ वाचेल आणि त्याला या सेवा खंडित झाल्याने बसणा-या फटक्यापासून वाचता येईल. एवढंच काय आयकर जमा करता येईल. बँकिंग, विमा सुविधा मिळेल आणि आधारकार्ड, पॅनकार्डसाठी अर्ज ही करता येईल. या योजनेतंर्गत प्रवाशांना लवकरच रेलटेलद्वारे सुरू होणाऱ्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या अर्थात किऑस्कच्या मदतीने कर भरणे शक्य होणार आहे. ‘सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड’ ( CSC- SPV) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भागीदारीत ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे, असे रेलटेलने एका निवेदनात म्हटले आहे. ही सेवा राज्यातील 12 रेल्वेस्थानकावर सुरु होईल. ही आयडियाची कल्पना लढवून रेलटेलने (RailTel) दळणवळण क्षेत्रात अमुलाग्र बदलाचा पायंडा पाडला आहे.
प्रवाशांचा साथी
हे किऑस्क ग्रामस्तरीय उद्योजक (VLE) चालवतील. सीएससीने ऑफर केलेल्या सेवांमध्ये प्रवासी तिकिटे (ट्रेन, एअर, बस इत्यादी), आधार कार्ड, व्होटर कार्ड, मोबाइल रिचार्ज, वीज बिल पेमेंट, पॅन कार्ड, आयकर, बँकिंग, विमा आणि इतर अनेक तिकिटांचे बुकिंग करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. किऑस्कचे नाव ‘रेलवायर साथी किऑस्क’ असे ठेवण्यात आले आहे – रेलवायर हे रेलटेलच्या रिटेल ब्रॉडबँड सेवेचे ब्रँड नाव आहे. सुरुवातीस वाराणसी शहर आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराज सिटी स्थानकांवरील रेलवायर साथी सीएससी किऑस्क प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आले आहेत. अशाच प्रकारचे किऑस्क सुमारे 200 रेल्वे स्थानकांवर कार्यान्वित केले जातील. त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील रेल्वे स्थानकांचा समावेश असणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना अनेकदा विविध ई-गव्हर्नन्स सेवांचा लाभ घेणे किंवा पायाभूत सुविधांच्या अभावामुळे तसेच इंटरनेटचा पुरेसा वापर न करता आल्याने डिजिटलायझेशनचा फायदा घेता येत नाही. आता रेलवायर साथी किऑस्क ग्रामीण जनतेला आधार देण्यासाठी ग्रामीण रेल्वे स्थानकांवर या आवश्यक डिजिटल सेवा उपलब्ध होतील असे रेलटेलचे सीएमडी पुनीत चावला यांनी स्पष्ट केले.
या रेल्वे विभागात सेवा
देशभरातील 200 रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विविध रेल्वे विभागातील रेल्वे स्थानकांची या पायलट प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी 44 दक्षिण मध्य रेल्वे झोनमध्ये आहेत, 20 उत्तर सीमा रेल्वेत आहेत, 13 पूर्व मध्य रेल्वेत आहेत,15 पश्चिम रेल्वेत आहेत, 25 उत्तर रेल्वेत आहेत, 12 पश्चिम मध्य रेल्वेत आहेत, 13 पूर्व किनारपट्टी रेल्वेत आहेत आणि 56 ईशान्य रेल्वेत आहेत.
महाराष्ट्रात 12 स्थानकांवर सुविधा केंद्र
या योजनेत महाराष्ट्रातील 12 स्थानकांचा समावेश आहे. या ठिकाणी कॉमन सर्व्हिस सेंटरच्या अर्थात किऑस्कच्या मदतीने प्रवाशांना सोयी-सुविधा प्राप्त होतील. त्यामध्ये तुमसर, अकोला,भुसावळ, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मनमाड, नाशिक रोड, ठाणे, माहिम, मुंबई सेंट्रल यांचा समाववेश आहे. रेल्वे स्थानकावर रेलवायर किऑस्कच्या सहायाने विमानाचे तिकिट, मालमत्ता कर, आयकर भरण्यासोबतच पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल रिचार्ज, वीजबिल भरणा, विमा हप्ता आदी सेवा मिळतील.
जगातील सर्वात मोठे वायफाय
रेलटेलने 6,090 स्थानकांवर सार्वजनिक वायफाय (‘Railwire ) प्रदान करून जगातील सर्वात मोठे wi-fi नेटवर्क तयार केले आहे; यापैकी 5,000 ग्रामीण भागात आहेत. कॉमन सर्व्हिस सेंटरच्या भागीदारीत रेल्वेटेल या स्थानकांवर सध्या अस्तित्वात असलेल्या या पायाभूत सुविधांचा वापर करून ग्रामीण भागात ब्रॉडबँड सेवा देण्याची योजना आहे, लवकरच ही योजना ही कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या :
मार्केट ट्रॅकर : नव्या वर्षातला पहिला आयपीओ बाजारात, इश्यू प्राईस ते लिस्टिंग जाणून घ्या!