धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा; मुख्यमंत्र्यांना विनंती करूनही…
धारावीत आज मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धारावीकरांनी मुंबई महापालिकेच्या या कारवाईला विरोध केला आहे. स्थानिकांनी तोडफोड करत आंदोलन केल्याने धारावीतील परिस्थिती तणावाची झाली आहे. यावर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
धारावीतील मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्याची कारवाई मुंबई महापालिकेने केली. त्याला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. स्थानिकांनी कडाडून विरोध करत महापालिकेच्या वाहनांची तोडफोड केली. तसेच रास्तारोको करत आपला निषेध नोंदवला आहे. पण या प्रकरणात काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी एक ट्विट करून मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही आज मुंबई महापालिकेने बुलडोझर पाठवून तडक कारवाई सुरू केली आहे. धारावीतील लोकांच्या भावना दुखावू नयेत म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना रात्री उशिरा भेटून या कारवाईला थांबवण्याची विनंती केली होती, असा दावा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महापालिका आयुक्तांना विनंती करते की, धारावीमध्ये सामाजिक सलोखा आणि शांततेचे वातावरण राखण्यासाठी ही कारवाई स्थगित करण्यात यावी. सर्व धारावीकर शांतता राखण्यासाठी झटत आहेत. आम्ही प्रशासन आणि पोलिसांशी सतत संपर्कात आहोत. धारावीच्या सामाजिक एकतेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.