अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मोहोळ बंदची हाक देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने 'जन सन्मान यात्रा' कार्यक्रमासाठी येत मोहोळ येथे होते.
अजित पवार यांच्या मोहोळ दौऱ्यापूर्वी अनगर येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावे या मुद्द्यासाठी मोहोळ बचाव संघर्ष समितीकडून मोहोळ बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान, मोहोळ बंदला मोहोळकरांचा सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनीच संघर्ष समितीच्या वतीने बंदची हाक दिली होती. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटातील मोहोळचे आजी-माजी आमदार विरुद्ध मुख्य प्रवक्ते विरोधात उभे ठाकल्याने अंतर्गत गटबाजी सामोरं आली आहे. मोहोळचे दादा गटाचेच माजी आमदार राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यात राजकीय संघर्ष आहे. राजन पाटलांच्या अनगर गावी अप्पर तहसील कार्यालय आमदार मानेंनी मंजूर केल्याने त्यांनाही विरोध कऱण्यात आलाय. तर उमेश पाटील यांनी ‘दादा आपसे बैर नही, राजन पाटील तेरी खैर नही’ म्हणत आक्रमक भूमिका घेतली आहे. तर मोहोळ बंदच्या हाकेवरून आज दादांनीच उमेश पाटील यांना खडसावलं आहे.