Beed Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये… नेमकं काय घडतंय?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये फरार झाल्यानंतर तिन्ही आरोपी गुजरातला गेले होते. गुजरातच्या गिरनार मंदिरामध्ये सुदर्शन घुले, सांगळे त्याचबरोबर आंधळे चा मुक्काम होता. तिन्ही आरोपींनी गिरनार मंदिरामध्ये पंधरा दिवस मुक्काम केला.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात येत आहेत. अशातच आरोपींवर कारवाई सुरू आहे. कोणत्याही दोषींना सोडणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी आधी भिवंडीमध्ये मुक्काम केला. ११ डिसेंबरला भिवंडीतून गायब झाल्यानंतर तिन्ही आरोपी गुजरातमध्ये गेले. गुजरातमधील प्रसिद्ध असलेल्या गिरनार मंदिरामध्ये हे तिन्ही आरोपी मुक्कामी होते. घुले, आंधळे आणि सांगळे हे तिघेही पंधरा दिवस गिरनारमध्ये मुक्कामी राहिले. जवळचे पैसे संपल्याने घुलेने कुणाशी तरी संपर्क केला आणि आंधळेला पैसे आणायला पाठवलं. पैसे आणायला गेलेला कृष्णा आंधळे मंदिरात परतलाच नाही. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पैसे संपल्याने मंदिरातून बाहेर पडले आणि पुण्यात आले. घुले आणि सांगळे पुण्याच्या बालीवडी परिसरामध्ये एका खोलीत मुक्कामाला राहिले. बालीवडी परिसरातूनच पोलिसांनी काल घुले आणि सांगळेला अटक केली आहे. तर आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांकडून आंधळेचा शोध घेतला जातोय. ‘ते कुठेही गेले असतील आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होतेय तुम्हाला दिसत आहे. मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाही’, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.