नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट, विरोधी नेत्याकडून पंतप्रधानपदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
जर तुम्ही पंतप्रधान पदासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला पाठिंबा देऊ, अशी ऑफर एका विरोधी नेत्यांनी दिल्याचा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला आहे. पाठिंब्याचा प्रस्ताव हा निकालाआधी दिला गेला की निकालानंतर? पदासाठी तडजोड मान्य नाही हे नितीन गडकरी कुणासंदर्भात बोलले? हे प्रश्न अनुत्तरीत असून यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
पंतप्रधानपदासाठी इच्छुक असाल तर विरोधकांमधील एक बडा नेता आपल्याला पाठिंबा देण्यास तयार होता, असा गौप्यस्फोटच भाजप नेते आणि मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. मात्र पदासाठी निष्ठा आणि प्रामाणिकपणाशी तडजोड करणार नसल्याचे सांगत आपण तो पंतप्रधानपदाचा प्रस्ताव फेटाळल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले. या दाव्यानंतर विरोधकांमधून नितीन गडकरींनी पाठिंबा देणार असल्याचा प्रस्ताव देणार कोण होते? असा सवाल केला जातोय. महाविकास आघाडीतील तीन पक्षांकडून आलेल्या प्रतिक्रियाही वेगवेगळ्या आहेत. मात्र पंतप्रधान होणं हे नितीन गडकरींचं छुपं स्वप्न राहिलं आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा असतील असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. तर ‘गडकरींनी देशाच्या सर्वोच्च पदावर बसण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी विरोधकांचा वापर करून मोदींना एक संदेश दिला आहे. देशाच्या नेतृत्वासाठी इंडिया आघाडीकजे अनेक सक्षम नेते आहेत. भाजपकडून उसनवारीची गरज नाही. नितीनजी तुम्ही फार छान आहात’, असं ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदींनी म्हटलं आहे.