भाजप नेत्यावरील ED कारवाई दाखवा अन् १ लाख मिळवा, कुणी कुठं केली बॅनरबाजी?
VIDEO | केंद्र सरकारकडून ईडीचा राजकीय हेतूने वापर केला जात असल्याचा आरोप, कुठं रंगली डिजिटल बॅनरची चर्चा
सांगली : गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे शहरात पोटनिवडणुकीचे बॅनर्स चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या बॅनरबाजीने राज्यभरात धुमाकूळ घातला तर आता ‘भाजप नेत्यांवर EDची कारवाई दाखवा, 1 लाख रुपये मिळवा’, अशी बॅनरबाजी केल्याचे समोर आले आहे. नुकतीच सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ED ने नोटीस बजावली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. जयंत पाटील यांना ED ने नोटीस बजावली याविरोधात जत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जतच्या एसटी स्टँड येथे चक्क डिजिटल बोर्ड लावल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा, असा आशय या बॅनरवर लिहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसचा “जाहीर निषेध” चा डिजिटल बोर्ड लावला आहे. त्यामुळे जत तालुक्यासह जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.