कृष्णा नदीच्या काठी पुन्हा मृत माशांचा खच, श्वास घेण्यासाठी जलचरांची तडफड
VIDEO | सांगली जिल्ह्यात भर उन्हाच्या तडाख्यात कृष्णा नदीच्या पात्रात शेकडो मासे मृत्यूमुखी पडल्यानंतर आता साताऱ्यातील कृष्णेत मृत माशांचा खच
सातारा : सांगली पाठोपाठ आता साताऱ्यातील कृष्णा नदीपात्रातही असंख्य मासे मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे. सांगली जिल्ह्यात भर उन्हाच्या तडाख्यात कृष्णा नदीच्या पात्रात शेकडो मासे मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेला केवळ सहा दिवस होत नाही तेवढ्यात सातारा जिल्ह्यात पुन्हा तशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे उघड झाले आहे. सातारा तालुक्यातील लिंब परिसरातील मर्ढे, साळवण, गोवे, वनगळसह परिसरातील इतर गावातील कृष्णा नदीच्या पात्रात हजारो मासे, खेकडे, इतर जलचरांचा मृत्यू होऊन ते आज पुन्हा पाण्यात तरंगताना दिसले. या प्रकारामुळे एकच भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाचे कृष्णा नदीकडे लक्ष आहे की नाही, असा गंभीर प्रश्न सध्या या घडलेल्या प्रकारामुळे उपस्थित होत आहे. तसेच हा प्रकार ज्यामुळे घडला त्या संबंधितांवर कारवाई होणार की नाही, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कृष्णा नदीच्या पात्रात मळी सदृश्य रसायन मिसळल्याने नदीतील खेकडे, मासे या दुषित पाण्यामुळे काठावर आले. तर काही माशांचा मृत्यू झाल्यामुळे ते पाण्यावर तरंगत होते.