Kurla BEST Accident : ‘…म्हणून गोंधळ झाला’, कुर्ला बेस्ट अपघातातील आरोपी बस चालकचा जबाब अन् उडाली खळबळ
वय वर्ष ५४ असणाऱ्या बस चालक संजय मोरे याला या अपघातापूर्वी गाडी चालवण्याचा अनुभव असला तरी त्याने यापूर्वी कधीच ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती. १ तारखेला ड्युटीवर रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच ऑटोमॅटिक बस चालवली असल्याचेही त्याने कबूल केलेय
ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सवय नसल्याने गोंधळ झाला, ज्या गाड्यांना क्लच नाही त्या चालवणं अतिशय गैरसोईच आहे, असा जबाब कुर्ला बेस्ट अपघातातील आरोपी चालक संजय मोरे याने दिला. इतकंच नाहीतर ९ डिसेंबरला रात्री ज्यावेळी हा अपघात घडला तेव्हा बसचा क्लच समजून आपण अॅक्सिलेटर दाबला होता, असंही संजय मोरे याने म्हटले. दरम्यान, कुर्ला बेस्ट अपघातातील आरोपी चालक संजय मोरे याने दिलेल्या जबाबानं एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणासंदर्भात तपासणी केल्यानंतर बसचे ब्रेक काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, वय वर्ष ५४ असणाऱ्या बस चालक संजय मोरे याला या अपघातापूर्वी गाडी चालवण्याचा अनुभव असला तरी त्याने यापूर्वी कधीच ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती. १ तारखेला ड्युटीवर रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच ऑटोमॅटिक बस चालवली असल्याचेही त्याने कबूल केले आहे. आरोपी बस चालकाला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करत त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर कोर्टाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.