जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना; गावकरी भावूक
मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी आणि मराठा हे कुणबीच आहेत आणि त्यामुळे हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला कुणबी दाखले देत आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या एकाच मागणीवर ठाम असून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला पुन्हा सुरूवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. वारंवार उपोषण करत असल्यामुळे जरांगे यांच्या शरीरात त्राण उरला नसल्याने त्यांना आता चालणंही कठीण झाल्याचे दिसून येत आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधत 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं होतं. उपोषणाच्या या चार दिवसात जरांगे यांनी अन्न आणि पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. मनोज जरांगे यांना प्रचंड थकवा जाणवत आहे. त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यांना चक्कर सारखं होत असून दोन पावलंही चालता येत नाही. चालताना त्यांना कार्यकर्त्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचे पाहायला मिळतेय. तर जिथे त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे, त्यास्थळी बसलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्था निर्माण होत आहे. मनोज जरांगे पाटील हे स्टेजवरून खाली उतरले, पण प्रचंड थकवा वाढल्याने त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहणं शक्य झालं नसल्याने त्यांनी लगेच बसून घेतलं. जरांगे यांची अवस्था पाहून गावातील महिलांना अश्रू अनावर झाले आहेत.