Special Report | Modi Cabinet Expansion मध्ये Pritam Munde ना संधी मिळणार? काय असू शकतात कारणं?
पंतप्रधान मोदींनी प्रीतम मुंडेंना मंत्रिपदाची संधी दिली तर त्याची कारणं कुठली असू शकतात? प्रमुख 5 कारणांचा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Modi Cabinet Expansion) याच आठवड्यात होईल असं सांगितलं जातं आहे आणि त्यातच महाराष्ट्रातून एखाद दोन खासदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल अशी चर्चा आहे. अजूनही अधिकृतपणे यावर कुणी काही बोलायला तयार नाही. पण ज्या दोन नेत्यांचं नाव चर्चेत आहे, त्यातले एक आहेत नारायण राणे (Narayan Rane) आणि दुसऱ्या आहे बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde). खरं तर प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा याआधीही होती पण त्यांना संधी मिळाली नाही. आता पुन्हा एकदा मोदी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचं नाव चर्चेत आहे. (Narendra Modi Cabinet Expansion : BJP Political Calculations behind choosing MP Pritam Munde in Ministry)
खरोखरच मोदींनी प्रीतम मुंडेंना मंत्रिपदाची संधी दिली तर त्याचे कारणे कुठले असू शकतात? आम्हाला त्यातली 5 कारणे दिसत आहेत. पाहुयात ती कोणती आहेत.
1. ओबीसी चेहरा : महाराष्ट्रात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणावरुन राजकीय संघर्ष सुरु आहे. त्यात ओबीसी भाजपापासून दुरावत असल्याचं चित्र विधानसभा निवडणुकींपासून दिसतं आहे. त्यातच राष्ट्रवादीनं ओबीसी नेत्यांना चांगली संधी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांना केंद्रात किंवा राज्यात संधी मिळाली नाही तर भाजपात अस्वस्थता वाढू शकते. कदाचित याच कारणामुळे प्रीतम मुंडेंना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते.
2. ओबीसी आरक्षणाचा झटका : सुप्रीम कोर्टानं अलिकडेच ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आणलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
त्यामुळेच पुढच्या काळात ओबीसींची स्थिती बिकट असेल. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्याच ओबीसींच्याच 120 जागा इतिहास जमा झाल्यात. ह्या सगळ्या निर्णयावर ओबीसी समाज केंद्रातल्या सरकारवरही नाराज दिसतो. ती नाराजी दूर करण्यासाठी ओबीसी चेहऱ्याला
मंत्रीपद दिलं तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो.
3. महिलेला संधी : प्रीतम मुंडे ह्या उच्च शिक्षित आहेत, पेशानं त्या डॉक्टर आहेत. आणि विशेष म्हणजे त्या महिला प्रतिनिधीही आाहेत. राज्यात सर्वाधिक मतानं लोकसभेला निवडुण येण्याचा मानही प्रीतम मुंडे यांच्याकडेच आहे. राज्यातून जे नेते केंद्रात मंत्री आहेत त्यापैकी एकही महिला नाही. त्यामुळेच प्रीतम मुंडेंना मंत्री केलं तर मोदींचा महिला सक्षमीकरणाचा नारा वास्तववादी असल्याचा संदेशही जाऊ शकतो.
4. गोपीनाथ मुंडेंचा वारसा : गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते हे त्यांचे विरोधकही मान्य करतात. भाजपाचा राज्यात वटवृक्ष करण्यात त्यांनी आयुष्य खर्ची घातलं. त्याच गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्या दोन्ही मुली पंकजा आणि प्रीतम यांच्याकडे पाहिलं जातं. त्यातल्याच प्रीतम मुंडेंना मंत्री केलं तर मुंडेंचा वारसा जपल्याचं भाजपला सांगता येईल. कारण त्या वारशावरच हक्क सांगण्याची राजकीय लढाई महाराष्ट्र पहातो आहे.
5. पंकजांची नाराजी : पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणात शांततेच्या भूमिकेत आहेत. अलिकडेच विनायक मेटे म्हणाले की, त्यांना सध्या काहीच काम नाही. पंकजा मुंडे सध्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत आणि मध्यप्रदेशच्या प्रभारी. राज्याच्या राजकारणातून मात्र त्या बाजुलाच
असल्याचं चित्रं आहे. पंकजा मुंडेंची भाजपवरची नाराजी लपूण राहिलेली नाही. त्यामुळेच प्रीतम मुंडेंना मंत्री केलं तर पंकजांची नाराजीही दूर होऊ शकते.
संबंधित बातम्या :
नारायण राणे, प्रीतम मुंडेंना केंद्रात स्थान मिळण्याची शक्यता किती?
राणेंना मंत्रिपद म्हणजे शिवसेनेच्या जखमेवर मीठ? सेना-भाजप एकत्र येण्यात कायमचा अडथळा?