Shrad Pawar letter to CM : ‘शक्यता नाकारता येत नाही…’, बीड हत्या प्रकरणावरून शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून एक पत्र लिहीलं आहे. बघा काय म्हटलंय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून एक पत्र लिहीलं आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी संतोष देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते. बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे आणि त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत असल्याचे शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रातून म्हटले आहे. तर असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी देखील शरद पवार यांनी निवेदन पत्राद्वारे केली आहे.