बारामतीकर वर्षानुवर्ष आम्हाला… अजित पवार यांच्या ‘त्या’ टीकेचा शरद पवार यांच्याकडून समाचार
विरोधकांकडून ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते, त्यांची भाषणं पाहता बारामतीचे लोक नोंद घेतील, असे म्हणत शरद पवार यांनी बारामतीमधील अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळाव्यातून अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे
बारामती, १७ फेब्रुवारी २०२४ : आम्ही भावनात्मक अपील करण्याचं कारण नाही. कारण बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखत आहेत. त्यामुळे आम्हाला भावनात्मक अपील करण्याची गरज नाही. पण विरोधकांकडून ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते, त्यांची भाषणं पाहता बारामतीचे लोक नोंद घेतील, असे म्हणत शरद पवार यांनी बारामतीमधील अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळाव्यातून अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. पुढे ते असेही म्हणाले की, उमेदवार कोणी असला तरी निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा अधिकार त्याला आहे. पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या मागे आहेत, आणि मीच एकटा आहे, असं भासवणं म्हणजेच लोकांना भावनिक करण्यासारखं आहे. लोकांची सहानुभूती मिळवण्याचं काम असल्याचे म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. बारामतीमधील अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार यांनी आपल्याला परिवारात एकटं पाडण्यात आल्याची भावना व्यक्त केली. तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणाही साधला होता.