Pune Ganesh Visarjan : पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील पहिला मानाचा पहिला कसबा गणपती बाप्पाती मिरवणूक आज सकाळा साडे दहा वाजता सुरू झाली. तर ११ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील बेलबाग चौकात ही मिरवणूक पोहोचली आणि ३ वाजून ३५ मिनिटांनी अल्का चौक पोहोचल्यानंतर सायंकाळी ४ वाजून ३४ मिनिटांनी कसबा गणपती बाप्पाचं विसर्जन झालं.
मुंबईप्रमाणे पुण्यातही गणेशोत्सवाची सांगता जल्लोषात करण्यात येत आहे. पुण्याची वैभवशाली पंरपरा असणाऱ्या गणेशोत्सवाची आज पारंपारिक पद्धतीने सांगता होत आहे. आज सकाळपासूनच गणपती बाप्पाच्या विसर्जनाची सुरूवात झाली आहे. गुलालाची उधळण, भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या अन् फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव पुण्यातील प्रत्येक चौका-चौकात बाप्पावर केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांच्या गजरात तरूणाई पारंपारिक वेशात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहे. यावेळी पुण्यातील अलका चौकात पारंपारिक खेळ देखील खेळले गेले. बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. अशातच लाडक्या आणि मानाच्या पहिला कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजून ३४ मिनिटांनी कसबा गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी गणेश भाविकांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी या… अशा जयघोषात बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन केले.