Russia Ukraine war: नाशिकचे 14 विद्यार्थी अद्यापही मायदेशी परतले नाहीत
युक्रेनमध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले. मात्र, अजूनही नाशिकमधील (Nashik) 14 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.
नाशिकः रशियाने (Russia) नाटो आणि अमेरिकेच्या इशाऱ्याला भीक न घालता युक्रेन (Ukraine) हे चिमुकले राष्ट्र घशात घालण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. युक्रेनमध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले. मात्र, अजूनही नाशिकमधील (Nashik) 14 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यामुळे या पालकांचे नातेवाईक आणि कुटुंबीय चिंतेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने प्रयत्नांची शिकस्त सुरू केली आहे. ते लवकरच नाशिकमध्ये परततील असा विश्वास व्यक्त होत आहे. भारतीय दूतावासाने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांसाठी काही सूचना दिल्यात. त्यांच्या मायदेशी परतण्याची लवकरच सोय करण्यात येणार आहे. त्यांनी पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जवळ ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय भारतीय दूतावासाची अधिकृत संकेतस्थळे, सोशल मीडिया हँडल पाहावीत. सध्या काय परिस्थिती आहे, याची माहिती घ्यावी असे आवाहन केले.