यंदा पवार कुटुंबाचे वेग-वेगळे पाडवे, अजित पवारांच्या बंडानंतर नात्यात फूट अन्….
आतापर्यंत बारामतीत पवार कुटुंबीयांचाच पाडवा व्हायचा मात्र आता अजित पवार यांच्या बंडामुळे आता नात्यांमध्ये दुरावा आल्याने पाडवे देखील दोन झाले आहेत. बारामतीमध्ये शरद पवारांचा तर काटेवाडीमध्ये अजित पवार यांचा पाडवा होणार आहे.
बंडामुळे पवार कुटुंबांच्या नात्यात एवढा दुरावा झालाय की दिवाळीचा पाडवाही वेग-वेगळा झालाय. शरद पवार यांच्या उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये गोविंदबागेत पाडव्याचं आयोजन करण्यात आलं. तर दुसरीकडे काटेवाडीत अजित पवार यांच्याकडून पाडव्याचं आयोजन करण्यात आलंय. म्हणजेच पाडवा साजरा करण्यातही पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे. पण लोकांच्या सोयीसाठी आपण वेगळा पाडवा आयोजित करत असल्याचे सांगून अजित पवार यांनी तिरकस उत्तर दिलंय. २०२२ पर्यंत प्रत्येक दिवाळीत पवार कुटुंब गोविंद बागेत एकत्र यायचं आणि सकाळपासूनच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी रांगा लागायच्या. यामध्ये अजित पवार त्यांच्या कुटुंबांसोबत सहभागी व्हायचेत. मात्र गेल्यावर्षीपासून बंडामुळेच अजित पवार यांनी शरद पवारांच्या गोविंद अजित बागेतील पाडव्याला जाणं टाळलं. दरम्यान, शरद पवार यांनी पुन्हा अजित पवारांवर निशाणा साधताना सत्तेसाठी काही लोकांनी आमदारांसह पलायन केलं असा थेट वार पवारांनी दादांवर केला. तर पक्ष वाढवण्यासाठी आमचाही खारीचा वाटा आहे, असं उत्तर अजित पवारांनी दिलंय.