मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस देखील डॉक्टर, जपानमधील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर
VIDEO | जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट जाहीर, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य, महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी मिळाला डॉक्टरेटचा मान
मुंबई, २२ ऑगस्ट २०२३ | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा जपानमधील कोयासन विद्यापीठाचे डीन श्री. सोएदा सॅन यांनी केली. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मानद डॉक्टरेटचा मान मिळाला आहे. जपान विद्यापीठाने मानद डॉक्टरेट जाहीर केल्यामुळे फडणवीस आता डॉक्टर देवेंद्र फडणवीस या नावाने ओळखले जातील तर एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईतील डी वाय पाटील विद्यापीठाने डी,लिट पदवी जाहीर केली आहे.