फुलांच्या उत्पादनात 50 टक्क्यांची घट तर दरामध्ये दुप्पट वाढ, काय आहेत कारणे ?
लग्नसराई आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. तर दुसरीकडे अवकाळीमुळे फुलांच्या उत्पादनात कमालीची घट झालीय. याचा परिणाम फुलांच्या दरावर झाला असून गत महिन्याच्या तुलनेत फुलांचे दर हे दुपटीने वाढलेले आहेत.
कोल्हापूर : मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला की त्याचे दर वाढणारच हे बाजारातले सुत्रच आहे. अगदी त्याचप्रमाणे सध्या फुलांचे होत आहे. लग्नसराई आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे (Increase in flower prices) फुलांच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ( impact of untimely rains) अवकाळीमुळे फुलांच्या उत्पादनात कमालीची घट झालीय. याचा परिणाम फुलांच्या दरावर झाला असून गत महिन्याच्या तुलनेत फुलांचे दर हे दुपटीने वाढलेले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा हा स्थानिक बाजारपेठेत आहे ना राज्यातील महत्वाच्या बाजारपेठेत त्यामुळे दर वाढले असले तरी उत्पादनातच घट असल्याने त्याचा पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना देखील फायदा झालेला नाही.
अजून महिनाभर फुलांचा सुंगध दरवळणारच
सर्वच फुलांची टंचाई सध्या बाजारपेठेत जाणवत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत झेंडू, निशिगंध, शेवंती, जरबेरा या फुलांच्या किंमतीमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे. शिवाय सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे मागणीत वाढ कायम असून अजून महिनाभर असेच चढे दर राहतील असा अंदाज व्यापारी वर्तवत आहेत. महिनाभरापूर्वी 5 रुपायाला 1 जरबेराचे फुल होते तेच आज 10 रुपयांवर गेले आहे. त्यामुळे मागणी वाढल्याचा परिणाम सर्वच फुलांवर झालेला आहे.
यामुळे वाढले दर
15 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळीचा परिणाम जसा पिकांवर झालेला आहे त्याचप्रमाणे तो फुलांवरही झालेला आहे. वातावरणातील बदलामुळे फुलांवर देखील करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे फुलांची तोडणी देखील मुश्किल झाली होती. अनेक बागा करप्याच्या प्रादुर्भावामुळे नष्ट झाल्या होत्या. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या नियमांत शिथिलता आल्याने लग्नसराई मोठ्या उत्साहात पार पडत आहे. त्यामुळे फुलांच्या मागणीत वाढ होत आहे.
बाजारपेठेतील फुलांचे दर
गतमहिन्यात निशिगंध हे 50 ते 60 रुपये किलो असे दर होते. आता मात्र, यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. सध्या 110 रुपये किलो असून मध्यंतरी तर मागणी वाढल्याने 150 रुपयांवर दर गेले होते. आता झेंडू 150 ते 200, शेवंती-80 ते 100 निशिगंध 100 ते 150 तर गुलाबाचे एक फुल हे 12 ते 15 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे फुलांच्या दरात दुपटीने वाढ झाली असली तरी उत्पादनही त्याच प्रमाणात घटले आहे.