राज्यात आतापर्यंत 27 टक्के पेरण्या, हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी, कृषीमंत्री दादाजी भुसेंचे आवाहन
शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज घेऊन आणि जमिनीतील ओलावा पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
मुंबई: राज्यात खरिपाच्या सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसापासून राज्यात पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत आहे. कोकण विभाग वगळता अन्यत्र राज्यभर तुरळक पाऊस होत असून भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात मान्सुन क्षीण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज घेऊन आणि जमिनीतील ओलावा पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. (Agriculture Minister Dadaji Bhuse appeal to farmers to start cultivation after sufficient rain)
पुढील आठवड्यात कमी पावसाचा अंदाज
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या दिनांक 22 जून 2021च्या साप्ताहिक हवामान अंदाजानुसार पुढील आठवड्यात पश्चिम मध्य व दक्षिण भारतात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पूर्वीच कृषी विभागाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला दिला होता. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतक-यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज पाहून व जमिनीतील उपलब्ध ओलावा पाहूनच पेरणी बाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले जात आहे.
22 जूनपर्यंत 27 टक्के पेरण्या
राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जुन पर्यंत राज्यात सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत 38 टक्के पेरण्या झाल्या होत्या.
मराठवाडा दुष्काळाच्या छायेत
मान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली. मात्र, नंतर पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यानं पेरण्या खोळंबल्या आहेत. मराठवाड्यातील 76 पैकी 60 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे. तर, पावसानं दडी मारल्यामुळे आतापर्यंत झालेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे.
राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जुन पर्यंत राज्यात सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत 38 टक्के पेरण्या झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये .@CMOMaharashtra @AUThackeray pic.twitter.com/0FUc6O6mgY
— Dadaji Bhuse (@dadajibhuse) June 24, 2021
संबंधित बातम्या:
बुलडाण्यात पुरेशा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
स्ट्रॉबेरी शेतीतून मोठ्या कमाईची हमी, शेतकऱ्यांना एक एकरात 8 लाखांच्या उत्पन्नाची संधी
(Agriculture Minister Dadaji Bhuse appeal to farmers to start cultivation after sufficient rain)