थकीत ऊसबिलाचा प्रश्न पेटला, कारखान्याच्या कृषी अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
ऊसाचा गळीत हंगाम सुरु झाल्यापासून माजलगाव येथील जय महेश साखर कारखाना ऊस बिलाच्या थकबाकीवरुन चर्चेत आहे. कोर्टाने आदेश देऊनही शेतकऱ्यांचे पैसे अदा न केल्याने बुधवारी एपीआय समोरच शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या कृषी अधिकाऱ्यास मारहाण केली होती. या प्रकरणी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड : ऊसाचा गळीत हंगाम सुरु झाल्यापासून माजलगाव येथील जय महेश साखर कारखाना ऊस बिलाच्या थकबाकीवरुन चर्चेत आहे. कोर्टाने आदेश देऊनही शेतकऱ्यांचे पैसे अदा न केल्याने बुधवारी एपीआय समोरच शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या कृषी अधिकाऱ्यास मारहाण केली होती. या प्रकरणी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर कारखान्यासमोर उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना आता चौकशीसाठीही हजर रहावे लागणार आहे. दरम्यान,ऊसाची नोंद करूनही कारखाना तोडणी करण्यासाठी मजूर पाठवत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.
पोलीस अधिकाऱ्यासमोरच झाला होता प्रकार
जय महेश साखर कारखाना हे शेतकऱ्यांचे थकीत ऊसबिल अदा करीत नाही. शिवाय शेतकऱ्यांबरोबर या कारखान्याचे व्यवहार हे व्यवस्थित नाहीत तर कोर्टाने आदेश देऊनही त्याचे पालन केले जात नाही. याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी या कारखान्यासमोर शेतकरी एकवटले होते. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे या हजर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. मात्र, कारखान्यांबद्दल शेतकऱ्यांच्या मनात रोष हा वाढतच आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आणि कारखाना प्रशासक यांच्यामध्ये खडाजंगी होत आहे.
शेतकऱ्यांची केली जातेय अडवणूक
शेतकऱ्यांचे ऊसबिल हे कारखान्याकडे थकीत असल्यामुळे सत्यप्रेम थावरे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्याचे आदेशही दिले होते. मात्र. त्याचे पालन तर करण्यात आलेच नाही शिवाय याचिकाकर्ते यांच्या ऊसाची नोंद घेऊनही तोडणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांचीही अडवणूक केली जात आहे. त्यामुळे ऊसाच्या फडातच आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी यापूर्वीच दिला होता.
कृषी अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची
कारखान्याकडे थकीत ऊसाचे बील आणि नोंदणी करुनही ऊसतोडीसाठी टोळी पाठवली जात नाही. याचा जाब विचारण्यासाठी शेतकरी एकवटले होते. दरम्यान कारखान्याचे कृषी अधिकारी सुजय पवार हे शेतकऱ्यांजवळ येऊन त्यांची अडचणी जाणून घेत होते. मात्र, अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची सुरु झाली. विशेष म्हणजे घटनास्थळी एपीआय प्रभा पुंडगे उपस्थित असताना हा प्रकार झाला होता. अखेर शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आता चौकशीसाठी शेतकऱ्यांना हजर रहावे लागणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे गंगाभिषण थावरे यांनी सांगितले आहे.