वीजबिले अंदाजेच : वापर कमी अन् बिले अवास्तव, काय आहे बांधावरचे वास्तव?
ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर ही वसुली केली जात आहे. मात्र, वास्तवतेचे भान ठेऊन ही कारवाई केली जात नसल्याचा आरोप आता शेतकऱ्यांमधूनच होऊ लागला आहे. कारण विजबीलाची प्रत तर शेतकऱ्यांना पोहचती केली जात नाहीच शिवाय अंदाजेच रक्कम थकबाकीत दाखवून वसुली केली जात आहे.
लातूर : सध्या (MSEDCL) महावितरणकडून अधिकच्या थकबाकी म्हणून विजतोडणीची मोहिम संबंध राज्यात सुरु आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर ही (Electricity Bill Collection) वसुली केली जात आहे. मात्र, वास्तवतेचे भान ठेऊन ही कारवाई केली जात नसल्याचा आरोप आता शेतकऱ्यांमधूनच होऊ लागला आहे. कारण वीजबीलाची प्रत तर शेतकऱ्यांना पोहचती केली जात नाहीच शिवाय अंदाजेच रक्कम थकबाकीत दाखवून वसुली केली जात आहे. त्यामुळे अवास्तव बिल शेतकऱ्यांकडून वसुल केले जात आहे. लातूर, अकोला येथील शेतकऱ्यांनी हा आरोप केला आहे.
सर्वाधिक थकबाकी ही कृषीपंपाकडे असल्याचे महावितरणचे म्हणने आहे. शेतकरी वेळेत बील अदा करीत नाहीत. शिवाय पिकांच्या भरण्यादरम्यान अधिकचा वापर केला जात आहे. मात्र, थकबाकीचा आकडा हा 75 हजार कोंटींवर गेला असल्याने आता कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहीमच राज्यात सुरु झाली आहे. लातूर जिल्ह्यात मांजरा पट्ट्यालगतचा विद्युत पुरवठा हा खंडीत करण्यात आला आहे.
रब्बी हंगामातच अधिकचा वापर तरीही
रब्बी हंगामातीलच पिके जोपासण्यासाठी कृषीपंपाचा वापर शेतकरी करतात. खरीप हंगामातील पिके तर पावसाच्या पाण्यावरच असतात. शिवाय गेल्या दोन वर्षापासून समाधानकारक पाऊस झाल्याने विजेचा वापर कमी झाला आहे. केवळ नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यानच कृषीपंप हे सुरु केले जातात. असे असतनाही बाराही महिन्यांच्या बिलांची सरासरी एकच धरुन अंदाजेच बिले अदा केली जात असल्याचा आरोप शेतकरी नवनाथ जगताप शिंदे यांनी केला आहे. शिवाय महावितरणकडून कसलेही विजबिल हे दिले जात नाही. लाईनमनच अंदाजित बिलाची मागणी करीत असतात. ऐन रब्बी हंगामात दरवर्षी शेतकऱ्यांना अडचणीत पकडून विजबिल वसुली केली जात आहे.
रोहित्राची दुरुस्ताही शेतकऱ्यांकडूनच
रब्बी हंगामाच्या भरण्यादरम्यान अधिकचा विजेचा वापर होत असल्याने रोहित्र जळण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र, याच्या दुरुस्तीची जबाबदारी ही महावितरणची असते मात्र, पार पाडावी लागते ती शेतकऱ्यांना. कारण वेळेत रोहित्र न मिळाल्यास पिकांना धोका निर्माण होतो. पण दुरुस्तीचे पैसे पुन्हा विजबिलातून कट केले जातील असे तोंडी सांगितले जाते पण प्रत्यक्षात काहीच कारवाई होत नाही, त्यामुळे महावितरणाच्या कारभाराने शेतकरी त्रस्त आहेत. ऐन रब्बी हंगामात लातूर तालुक्यातील गाधवड, तांदूळजा तसेच मांजरा नदीलगतच्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
विज पुरवठ्यातही अनियमितता
हंगाम सुरु होण्यापूर्वी कृषीपंपासाठी 10 तास विद्युत पुरवठा केला जात होता. मात्र, रब्बी हंगामातील पिकांची उगवण होताच यामध्ये बदल करुन 8 तास पुरवठा करण्याच आला आहे. यामध्येही रात्रीच्या वेळी विज देण्यात आल्याने शेतकऱ्यांना थंड़ीत शेताची वाट तुडवत भरणे उरकून घ्यावे लागत आहे. तर 8 तासही नियमित पुरवठा होत नाही. यामध्ये तांत्रिक बिघाड झाला तर केवळ 4 ते 5 तासच विद्युत पुरवठा होतो. त्यामुळे महावितरण कंपनीने सक्तीची आणि अधिकची वसुली करु नये अशी मागणी नवनाथ शिंदे तसेच सर्व शेतकऱ्यांमधून केली जात आहे.