Rain in Thane : जोरदार आणि धुवाँधार! ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या 106 टक्के पाऊस; खरीपाची सुमारे 87 टक्के लागवड
Rain in Thane : खरीप हंगामासाठी सुमारे 133 टक्के रासायनिक खतांचा पुरवठा झाला असून खते, बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यातील 112 कृषी सेवा केंद्रांतुन खतांची व 120 कृषी सेवा केंद्रांतुन बियाणे विक्री केली जात आहे.
ठाणे: ठाणे जिल्ह्यात (thane) कालपर्यंत सरासरीच्या 106 टक्के पाऊस झाला (rain in thane) असून खरीपाची सुमारे 87 टक्के लागवड झाली आहे. जिल्ह्यात या हंगामासाठी सुमारे 133 टक्के रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात खते, बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला आहे. विविध योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यात 177 शेतीशाळा सुरु असून 5310 शेतकरी बांधवाना प्रशिक्षण दिले जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ (mohan wagh) यांनी सांगितले. तालुकानिहाय पावसाचे प्रमाण पाहता ठाणे तालुक्यात 97 टक्के, कल्याणमध्ये 96 टक्के, मुरबाड 96.50 टक्के, भिवंडी 106.60 टक्के, शहापूर 126.70 टक्के, उल्हासनगर 123.70 टक्के तर अंबरनाथ तालुक्यात 156.80 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कालपर्यंत सुमारे 1653.50 मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या 106.10 टक्के असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
दमदार पाऊस झाल्यान खरीपाची लागवड जवळपास पूर्ण होत आली आहे. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात 87 टक्के लागवड झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक मोहन वाघ यांनी सांगितले. त्यामध्ये भात 47 हजार 169 हेक्टरवर (85.88 टक्के) लागवड झाली आहे. नागली 1825.50 हेक्टर (75.85 टक्के), वरी 992.40 हेक्टर (94 टक्के) तर तूर 4327 हेक्टर (104.70 टक्के) अशी लागवड झाली आहे.
खते आणि बियाणांची विक्री जोरात
खरीप हंगामासाठी सुमारे 133 टक्के रासायनिक खतांचा पुरवठा झाला असून खते, बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यातील 112 कृषी सेवा केंद्रांतुन खतांची व 120 कृषी सेवा केंद्रांतुन बियाणे विक्री केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सेस फंडातून 800 क्विंटल भात बियाणे शेतकरी बांधवांना 50 टक्के अनुदानावर देण्यात आले आहे. जिल्ह्यातील 542 गावामध्ये शेतकरी बांधवानी घरचे नागली व भात बियाणे पेरणीसाठी वापरले असल्याने 3 टक्के मिठाच्या द्रावणाची व जैविकखताची बिजप्रक्रिया करणेचे प्रात्याक्षिके व प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे.
जिल्ह्यात 177 शेतीशाळा सुरु
राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून जिल्ह्यातील कमी उत्पादकता असलेल्या गावात भातपिकाचे रत्नागिरी 8 वाणाचे प्रमाणीत बियाणेचे भात पिकांचे पिक प्रात्यक्षिके 580 हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येत आहे. 232क्विंटल बियाणे 50 टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात आले आहे. विविध योजनेंतर्गत जिल्ह्यात 177 शेतीशाळा सुरु असून 5310 शेतकरी बांधवाना प्रशिक्षण दिले जात आहे. क्रॉपसप योजनेच्या माध्यमातून भात व नागली पिकावरील कीड, रोग इत्यादी सर्वेक्षण सुरु असून शेतकरी बांधवाना किड/रोग नियंत्रणाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले जात असल्याचे वाघ यांनी सांगितले.
भात पिकाचा विमा काढा
जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी बांधवांचा पिक विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एकूण 31 हजार 44 शेतकऱ्यांनी भात पिकाचा विमा उतरविला आहे. त्यामाध्यमातून 12 हजार 543 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी भात पिकाचा विमा काढावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.