अवकाळी पाऊस बेतला जीवावर, नुकसानीमुळे द्राक्ष बागायत शेतकऱ्याची आत्महत्या
अवकाळीने झालेल्या नुकसानीच्या खुना आता खऱ्या अर्थाने समोर येऊ लागल्या आहेत. पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पन्न वाढवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न हा अयशस्वी ठरत आहे. दरवर्षी द्राक्ष बागेचे होत असलेले नुकसान अन् वाढते कर्ज यामुळे मिरज तालुक्यातील द्राक्ष बागायत शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
सांगली : अवकाळीने झालेल्या नुकसानीच्या खुना आता खऱ्या अर्थाने समोर येऊ लागल्या आहेत. पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पन्न वाढवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न हा अयशस्वी ठरत आहे. दरवर्षी द्राक्ष बागेचे होत असलेले नुकसान अन् वाढते कर्ज यामुळे मिरज तालुक्यातील द्राक्ष बागायत शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या प्रसंगीच दरवर्षी बागांचे नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
मिरज तालुक्यातील मालगाव येथील चिदानंद घुळी हे दरवर्षी द्राक्षाचे उत्पादन घेत होते. मात्र, गेल्या तीन वर्षापासून अवकाळी पावसामुळे उत्पादन कमी अन् खर्च अधिक अशीच स्थिती होती. यामुळे त्यांच्यावर बॅंकेचे आणि खासगी सावकाराचेही कर्ज झाले होते. यंदाही द्राक्षांची तोडणी 15 दिवसांवर आली असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये तीन एकरातील द्राक्षांची मणगळ झाली. आता कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून चिदानंद यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले आहे.
तीन एकरात द्राक्ष बाग अन् तीन वर्षापासून नुकसान
चिदानंद घुळी यांनी उत्पादन वाढीच्या अनुशंगाने द्राक्ष बागेची लागवड केली होती. सुरवातीच्या काही वर्ष यामधून उत्पादनही मिळाले मात्र, गेल्या तीन वर्षापासून अवकाळी पावसाने फळबागायत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ऐन तोडणीच्या प्रसंगीच अवकाळी हजेरी लावत असल्याने मणीगळ होत आहे. त्यामुळे वर्षभर केलेला खर्च आणि मेहनत दोन्हीही निष्फळ ठरत आहे. घुळी यांच्याकडे बॅंकेचे तसेच खासगी सावकारांचेही कर्ज होते. यंदाही नुकसान झाल्याने कर्ज कसे फेडावे या काळजीनेच त्यांनी हे टोकाचे पाऊस उचलले.
2 लाख एकरांवरील बागांचे नुकसान
राज्यात 5 लाख एकरावर द्राक्षे बागांची लागवड केली जाते. गेल्या काही दिवसांपासून अधिकच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा कल याकडे वाढत आहे. मात्र, निसर्गाची साथ मिळत नाही. त्यामुळे उत्पादनावर झालेला खर्चही निघणे मुश्किल होत आहे. गेल्या 3 वर्षात अवकाळी पावसामुळे तब्बल 26 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. तर मध्यंतरी झालेल्या अवकाळीमुळे तब्बल 2 लाख एकरावरील बागांचे नुकसान झाले असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी सांगितले आहे. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागांची पाहणी केली होती.