Ram Mandir : अप्रतिम… अद्भूत… एकमेवाद्वितीय… राम मंदिराच्या ‘गर्भगृहा’चा पहिला फोटो व्हायरल; इथे विराजमान होणार रामलल्ला
अयोध्येतील राम मंदिराचं काम जोरात सुरू आहे. गर्भगृहाच्या कामाचा वेग अधिकच वाढला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जानेवारी 2023च्या तिसऱ्या आठवड्यात हे मंदिर पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अयोध्या : गेल्या अनेक वर्षापासून राम मंदिराच्या प्रतिक्षेत असलेल्या राम मंदिरासाठी एक आनंदाची बातमी आहे. राम मंदिर आता पूर्णत्वाच्या दिशेने आहे. या भव्य राम मंदिरातील गर्भगृहाचा फोटो समोर आला आहे. या गर्भगृहात दगडांवर कोरीव काम सुरू आहे. काही दगडांना आकार दिला जात आहे. गर्भगृहातील कामांचा हा फोटो पाहिल्यानंतर मंदिराच्या भव्यतेचं दर्शन घडतं. अद्भूत… अप्रतिम आणि एकमेवाद्वितीय… असेच शब्द तोंडून बाहेर पडतात. या गर्भगृहाची डिझाईन आर्किटेक्ट कसीबी सोनपुरा आणि आशिष सोनपुरा यांनी तयार केली आहे.
याच वर्षी म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत गर्भगृहाचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर रामलल्लांची विधीवत पूजा करून त्यांची स्थापना होणार आहे. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचा शिलान्यास केला होता. यावर्षी डिसेंबरपर्यंत मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. यावेळी होणाऱ्या महापूजेला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. या पूजेनंतर रामभक्तांना मंदिर दर्शनासाठी उघडे राहील. रामजन्मभूमी परिसरात महाकाय खांब उभारून मंदिर बांधलं जात आहे. मंदिरातील गर्भ गृहात रामलल्ला बाल अवस्थेत विराजमान होतील. त्यांच्यासोबत त्यांचे लहान भाऊ भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सुद्धा विराजमान होतील.
तरच रामलल्लाचं दर्शन होणार
रामलल्लाचं मंदिर अत्यंत भव्य बांधण्यात येत आहे. त्यामुळे भक्तांना रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी 21 फूट शिड्या चढून वर जावं लागणार आहे. त्यानंतरच त्यांना रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे. 160 खांब उभारून गर्भगृह उभारलं जात आहे. गर्भगृह संगमरवरी असेल. त्याची झलक या फोटोतून पाहता येणार आहे. मंदिर समितीने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या तळाला 132 आणि दुसऱ्या स्तरावर 74 खांब असणार आहेत.
दर्शन जानेवारीत
स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी मंदिरात मूर्तीची कधी प्रतिष्ठापणा होणार याची माहिती दिली आहे. जानेवारी 2024च्या तिसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करतील, असं स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी सांगितलं.
भक्त भावूक
रामंदिराचं अत्यंत वेगानं काम सुरू आहे. गर्भगृहाचं काम तर अधिकच वेगाने सुरू आहे. जय श्रीराम 2023 अशी अक्षरे असलेल्या विटा लावण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी रामलल्लाची मूर्ती स्थापित होणार आहे, तिथे भगवा ध्वज लावण्यात आला आहे. शेकडो इंजीनिअर आणि कर्मचारी हे काम दिवस रात्र मेहनत घेऊन पूर्ण करत आहेत. रामलल्लाच्या गर्भगृहाचे फोटो पाहून रामभक्त अधिकच भावूक झाले आहेत. रामभक्तांनी सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी तर जय श्रीराम… जय गर्भगृह अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.