Budget 2023 | करसवलत ते ‘या’ खास योजना.. बजेटकडून वर्किंग वुमनच्या काय अपेक्षा?
अर्थसंकल्पाच्या बाबतीत समाजातील विविध घटकांकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. एक महिलाच दुसऱ्या महिलेला समजू शकते, असं म्हणतात. त्यामुळे वर्किंग वुमन असो किंवा मग गृहिणी.. प्रत्येकीला निर्मला सीतारामण यांच्या बजेटकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
मुंबई: या वर्षीच्या अर्थव्यवस्थेचं गाठोडं उद्या म्हणजेच बुधवारी खुलणार आहे. या बजेटकडून प्रत्येकाच्या मनात काही ना काही अपेक्षा आहेत. अनेकांच्या नजरा या बजेटवर खिळल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या बजेटच्या पिटाऱ्यातून यावर्षी कोणकोणत्या गोष्टी बाहेर पडणार आहेत, याकडे प्रत्येकाची नजर लागून आहे. अर्थसंकल्पाच्या बाबतीत समाजातील विविध घटकांकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. एक महिलाच दुसऱ्या महिलेला समजू शकते, असं म्हणतात. त्यामुळे वर्किंग वुमन असो किंवा मग गृहिणी.. प्रत्येकीला निर्मला सीतारामण यांच्या बजेटकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
देशात महिला उद्योजिकांचं प्रमाण खूप कमी आहे. बहुतांश महिला या लघुउद्योग किंवा असंघटित क्षेत्रात काम करत आहेत. सध्याच्या डिजिटलच्या काळात महिलाकेंद्रीत स्टार्टअप्सना चालना देणाऱ्या योजना या बजेटमध्ये अपेक्षित आहेत. त्याचसोबत महिलांच्या छोट्या व्यवसायाचं सक्षम उद्योगात रुपांतर करण्यासाठी आवश्यक असणारं ट्रेनिंग, तंत्रज्ञान आणि भांडवल यांची विशेष तरतूद या बजेटमध्ये करणे गरजेचं आहे. आता महिला फक्त पापड आणि गृहोद्योगपर्यंतच मर्यादित नाहीत. त्याचप्रमाणे प्रॉपर्टी खरेदी करताना टॅक्समध्ये सवलत मिळावी, अशी महिलांची अपेक्षा आहे.
गरोदर महिलांसाठी विविध योजना अमलात आणल्या जाव्यात, जेणेकरून नोकरीवर त्याचा परिणाम होऊ नये. त्याचप्रमाणे ज्या महिलांकडे कोणतीच पेन्शन योजना नाही. त्यांच्यासाठी पेन्शन योजना सुरू करावी. महिला उद्योजकांना व्यवसाय करण्यासाठी सवलतीच्या दरात कर मिळावा.
कार आणि मालमत्ता यांसारख्या खरेदीवर महिलांना कर सूट मिळावी अशीही अपेक्षा आहे. जेणेकरून महिलांना अधिक आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकेल.
बाळंतीण आणि गरोदर महिलांसाठी काही नवीन योजना या अर्थव्यवस्थेत समाविष्ट करण्याची अपेक्षा आहे. महिलांसाठी परवडणारं बालसंगोपनाचाही विचार त्यात करू शकतात. अनेक काम करणाऱ्या महिलांसाठी हा अनेकदा सर्वांत मोठा अडथळा असतो. मात्र त्यांच्यासाठी काही योजना असल्यास महिला काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांच्यात समतोल साधू शकतील.