सेल्सगर्ल ते अर्थमंत्री? कसा झाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा प्रवास
जेएनयूमध्ये शिक्षण घेताना सीतारामन यांची ओळख डॉ. परकला प्रभाकर यांच्याशी झाली. दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर सीतारामन लंडनल्या शिफ्ट झाल्या
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या कामाचे देशातच नव्हे तर परदेशातही कौतुक होत आहे. त्या नेहमीच नवनवीन आव्हानांशी लढताना दिसतात. भारताच्या अर्थमंत्री म्हणून त्या सलग पाचव्यांदा केंद्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशाच्या अर्थमंत्री म्हणून आपल्या कार्य व कौशल्याने राजकारणात वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे. परंतु त्यांच्या करियरची सुरुवात सेल्स गर्ल म्हणून झाली होती, हे अनेकांना माहीत नाही.
अर्थशास्त्रातून पदवी
तामिळनाडूच्या मदुराई येथे एका ब्राह्मण कुटुंबात निर्मला सीतारामन यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी झाला. वडील नारायण सीतारामन हे रेल्वे प्रशासनात नोकरीला होती. त्यांची आई सावित्री सीतारामन या गृहिणी. रेल्वेच असल्यामुळे वडिलांची सतत बदली होत होती. या बदल्यांमुळे सीतारामन यांना तामिळनाडूत अनेक ठिकाणी राहावे लागले. निर्मला सीतारामन यांनी तिरुचिरापल्लीच्या सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात पदवी प्राप्त घेतली. पुढे नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.
जेएनयूमध्ये शिक्षण घेताना सीतारामन यांची ओळख डॉ. परकला प्रभाकर यांच्याशी झाली. दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर सीतारामन लंडनल्या शिफ्ट झाल्या. लंडनमध्ये एका होम डेकोर स्टोरमध्ये त्यांनी सेल्सगर्ल म्हणूनही काम केले होते. तसेच लंडनमधील प्राईस वॉटर हाउस येथे मॅनेजर पदावर त्यांनी काम पाहिले.
शिक्षण क्षेत्रातून राजकारणात
निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीला शिक्षण क्षेत्रात काम केले. पुढे त्यांनी 2003 ते 2005 या काळात त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य होत्या. निर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्षात 2006 साली प्रवेश करुन राजकीय कारर्किदीला श्रीगणेशा केला. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून 2010 साली सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आली. नरेंद्र मोदींचा 2014 साली ऐतिहासिक विजय झाला. मोदींच्या मंत्रिमंडळात सीतारामन यांना राज्य मंत्रीपद देण्यात आले. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाचे राज्यमंत्री पद सांभळले. त्यानंतर सीतारामन यांच्याकडे पूर्णवेळ संरक्षण मंत्रालयाचा कारभार दिला आणि इतिहास रचला गेला. कारण पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री होण्याचा मान त्यांना मिळवला.
दुसऱ्यांदा इतिहास रचला
संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी यशस्वी पार पाडल्यानंतर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात सीतारामन यांना अर्थमंत्री पदाची जबाबदारी दिली. यापूर्वी 1970-71 मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदासोबतच अर्थ खाते सुद्धा स्वत:कडे ठेवले होते. म्हणजेच त्या पुर्णवेळ महिला अर्थमंत्री नव्हता. सीतारामन याच खऱ्या अर्थाने भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या.