Budget 2024 | महिला, शेतकरी, गरीब, तरुणाईसाठी विशेष तरतूद, बजेटमध्ये काय असेल खास
Budget 2024 | या 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांसाठी खास घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकारने GYAN (गरीब, युवा, अन्नदाता, नारी) असा मंत्र जपला आहे. या चार गटांना खुश करण्यासाठी या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली | 13 जानेवारी 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे अंतरिम बजेट आहे. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करतील. त्या सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. यंदा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. त्यामुळे महिला, शेतकरी, गरीब आणि तरुणांसाठी या बजेटमध्ये खास तरतूद करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या वर्गाची मते वळविण्यासाठी कदाचित बजेटमध्ये मोठी घोषणा होऊ शकते.
GYAN वर विशेष जोर
मोदी सरकार या अंतरिम अर्थसंकल्पात गरीब, युवा, किसान आणि महिलांसाठी (GYAN) खास तरतूद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटकांना खुश करण्यासाठी खास तरतूद, योजनेची घोषणा होण्याची शक्यता आहे. महिलांसाठी अगोदरच अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. लखपती महिला योजनेला गती देण्याची शक्यता आहे.
बजेटमध्ये होऊ शकतात या मोठ्या घोषणा
- घरांसाठी Interest Subvention Scheme ची घोषणा होऊ शकते
- NPS आकर्षक होण्यासाठी सामाजिक सुरक्षा वाढवल्या जाऊ शकते
- PM Kisan योजनेतील रक्कम वाढू शकते. ही रक्कम 8000 ते 9000 रुपये होऊ शकते
- शेतकऱ्यांना आरोग्य, जीवन विम्यासाठी खास तरतूद, पीक विम्यासाठी विशेष तरतूद
- महिला कल्याण, सक्षमीकरणासाठी निधीची तरतूद वाढविण्यात येऊ शकते
- महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याची विशेष सोय
- महिलांसाठी कौशल्य विकास आणि प्रशिक्षणावर अधिक भर
- महिला शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी 12 हजार रुपयांपर्यंतची तरतूद
- मनरेगात महिलांसाठी खास आरक्षण, मानधनात वाढीची शक्यता
- महिलांसाठीच्या योजनांवरील व्याज दर वाढविल्या जाऊ शकतो
सध्या 60 हजार कोटींचे बजेट
चालू आर्थिक वर्षात मोदी सरकारने पीएम किसान योजनेसाठी 60 हजार कोटींचे बजेट राखीव ठेवले आहे. जर मोदी सरकारने हप्ता वाढविण्याचा निर्णय घेतला तर मग ही तरतूद वाढवावी लागणार आहे. सरकारने वार्षिक 8 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला तर 88,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. तर 9 हजार रुपये देण्याचा विचार केल्यास 99,000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी लागेल.