केवळ महिन्याभरात गौतम अदानी यांची संपत्ती निम्म्यावर
जगभरातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी आता टॉप 20 मध्येही नाही. त्यांच्या संपत्तीत आतापर्यंत 59.2 अब्ज डॉलरची घट झाली आहे. महिन्याभरात हा मोठा बदल झाला आहे.
नवी दिल्ली : काही काळापूर्वी ब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) तिसऱ्या क्रमांकावर होते. परंतु महिन्याभरात ते या यादीत टॉप 20 मध्येही नाही. त्यांच्या संपत्तीत आतापर्यंत 59.2 अब्ज डॉलरची घट झाली आहे. श्रीमंतांच्या यादीतही ते टॉप 20 मधून बाहेर पडले आहे. या वर्षात आतापर्यंत त्यांची संपत्ती जवळपास 50% कमी झाली आहे. (Gautam Adani Net Worth)
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत या वर्षात 59.2 अब्ज डॉलरची घट झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती $61.3 अब्ज इतकी खाली आली आहे. ब्लूमबर्गच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते तिसऱ्या स्थानावरुन 21 व्या स्थानावर गेले आहे.
मुकेश अंबानी आशियात अव्वल
काही काळापूर्वी गौतम अदानी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी 80.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 12 व्या स्थानावर आहेत. या यादीत एकही आशियाई व्यक्ती त्यांच्या पुढे नाही. अंबानी आशियातील सर्वात श्रीमंताच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. चीनचे झोंग शानशान हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच 69.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील 14 व्या क्रमांकावर आहेत.
टॉप 10 मध्ये कोण कोण?
फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड आरनॉल्ट हे जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या नंबरवर आहेत. टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क दुसऱ्या स्थानी, अॅमेझॉनचे जेफ बेजोस तिसऱ्या, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स चौथ्या, दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफेट पाचव्या, लॅरी एलिसन सहाव्या, लॅरी पेड सातव्या, स्टीव्ह वाल्मर आठव्या, सर्गेई ब्रिन नवव्या तर कार्लोस स्लिम दहाव्या स्थानी आहेत.
का झाली संपत्ती कमी
अमेरिकेतील नावाजलेली गुंतवणूक संशोधन संस्था हिंडनबर्गच्या (Hindenburg) एका अहवालाचा फटका गौतम अदानी (Gautam Adani) यांना बसला आहे. या अहवालात अदानी समूहावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यानुसार, समूहाने शेअर्समध्ये फेरपार केली आणि लेखा परिक्षणात गडबडीचा आरोप करण्यात आला आहे. अर्थात या अहवालाने अदानी समूहाची चिंता वाढवली. अदानी समूहाने अहवालातील आरोप फेटाळले आणि कायदेशीर कार्यवाहीची तयारी सुरु केली. पण तोपर्यंत या अहवालाने अदानी यांचे मोठे नुकसान केले आहे. फोर्ब्स बिलेनियर्स इंडेक्स (Forbes Billionaires Index) नुसार, अदानी यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासात 17.38 टक्क्यांची घसरण झाली.